सावंतवाडी : इन्सुली -कोठावळेबांध येथील सोनाली गावडे (25) हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास बांदा पोलिसांकडून योग्य दिशेने होत नसल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सोनालीचा मृतदेह घराच्या जवळ दोन फूट पाण्यात आढळला होता. घटनास्थळी सापडलेल्या दोन छत्र्या आणि पहिल्या दिवशी न सापडलेला मोबाईल दुसर्या दिवशी मिळून आल्याने या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे.
सोनाली मंगळवार 8 जुलै रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कामासाठी निघाली होती, परंतु ती कामावर पोहोचली नाही आणि घरीही परतली नाही. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर बांदा पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दुसर्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह कामावर जाण्याच्या वेशात, बॅग लावलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र, कमी पाण्यात मृतदेह सापडल्याने अनेकांनी संशय व्यक्त केला होता. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे नमूद करण्यात आले असले तरी घटनास्थळावरील वस्तू आणि परिस्थिती संशयास्पद आहेत.
या सर्व बाबींमुळे सोनालीचा मृत्यू घातपात आहे की अपघात, याबाबत पोलिसांनी चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जर खरोखरच हा घातपात असेल, तर दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे. बांदा पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन निःपक्ष तपास करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी सोनालीच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
सोनालीचा मृतदेह सापडला, त्यावेळी तिच्या पाठीला बॅग होती आणि त्यातील सामान व्यवस्थित होते. तिच्याजवळ एक छत्रीही सापडली होती, पण तिचा मोबाईल पहिल्या दिवशी कोठेच नव्हता. दुसर्या दिवशी पोलिस पुन्हा घटनास्थळी गेले असता, जिथे मृतदेह सापडला होता त्याच्या जवळच दुसरी छत्री आणि तिच्याखाली सोनालीचा मोबाईल आढळून आला. विशेष म्हणजे, मृतदेहाजवळ सापडलेली पहिली छत्री सोनालीची नसल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितले, तर दुसर्या दिवशी सापडलेली छत्री तिची असल्याचे त्यांनी ओळखले. यामुळे दोन छत्र्या घटनास्थळी कशा आल्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, पहिल्या दिवशी न सापडलेला मोबाईल दुसर्या दिवशी त्याच ठिकाणी कसा आढळला, यावरून कुटुंबीयांचा संशय अधिक गडद झाला आहे.