सावंतवाडी : शिरोडा नाका सालईवाडा येथे महावितरण कंपनीने धोकादायक झाड न तोडल्याने ते माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांच्या पत्राशेडवर पडले. या दुर्घटनेत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्रत्येकवर्षी मे महिन्यात वीज वाहिन्यांना स्पर्श करणारी झाडे आणि फांद्या तोडणे महावितरण कंपनीकडून अपेक्षित असते. मात्र, यावर्षी तसे न झाल्याने मंगळवारी झालेल्या वादळी वार्यामुळे शिरोडा नाक्यावरील बांदेकर यांच्या पत्राशेडवर मोठे ऐनाचे झाड कोसळले. यामुळे शेडचे सिमेंटचे पत्रे तुटून गेले.
शहरात अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांना स्पर्श करणारी धोकादायक झाडे आणि फांद्या आहेत. महावितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या धोकादायक फांद्या आणि झाडे कधी हटवणार? असा सवाल नागरिक विचारत आहेत. वेळीच उपाययोजना न केल्यास नुकसानीची शक्यता आहे.