सावंतवाडी : सावंतवाडी-शिरोडा नाका परिसरात असलेल्या ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्राच्या इमारतीला सोमवारी रात्री 9.30 वा. च्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीची माहिती मिळताच सावंतवाडीचे पोलिस हवालदार प्रवीण वालावलकर, अमित राऊळ आणि मनोज गुंजाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. नगरपालिकेच्या बंब कर्मचार्यांनी आग विझवण्यासाठी त्वरित कारवाई सुरू केली.
यामध्ये पालिकेचे अधिकारी वैभव अंधारे, दीपक म्हापसेकर, प्रदीप सावरवाडकर, गजानन परब, पांडुरंग कोळापटे, सुमित कदम, मनोज राऊळ आणि तुषार सरडे यांनी सहभाग घेतला. उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या आतील साहित्याला आग लागल्याचे सांगण्यात आले. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज अजून आलेला नाही, पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.