सावंतवाडी : राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी कुडाळ येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष (भाजप) कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी पत्रकार परिषदेत बोलताना गोगावले यांना आठ दिवसांच्या आत जाहीर माफी मागण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा, शिवसेना कार्यालयासमोर ‘तिरडी आंदोलन’ करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सारंग म्हणाले, मंत्री गोगावले यांनी खा. नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीचा अपमान केला आहे. राणे यांनी शाखाप्रमुख, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्याबद्दल बोलताना गोगावलेंनी तारतम्य बाळगणे आवश्यक होते. महायुतीचा भाग असूनही त्यांनी हे वक्तव्य करून त्याचे उल्लंघन केले आहे.
नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासातील योगदानाचा उल्लेख करत श्री. सारंग म्हणाले, खा. राणेंनी कोकणच्या विकासासाठी मोठे प्रयत्न केले आहेत आणि राज्यभर आपली ताकद निर्माण केली आहे. अशा मोठ्या नेत्याबद्दल केलेले वादग्रस्त विधान म्हणजे गोगावलेंनी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी गोगावलेंना समज द्यावी आणि त्यांना जाहीर माफी मागण्यास सांगावे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये 70 टक्के जागा लढवण्याच्या गोगावलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सारंग म्हणाले, भाजप जिल्ह्यात मजबूत आहे आणि कार्यकर्ते स्वबळावर लढण्यास इच्छुक आहेत. यापूर्वीही भाजपने महायुतीसाठी काम केले आहे, परंतु कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची आहे.
आ. दीपक केसरकर यांनी कालच्या वक्तव्या दरम्यान गोगावलेंना थांबवायला हवे होते, असेही सारंग म्हणाले. माजी नगरसेवक गुरु मठकर, उदय नाईक, भाजपचे मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, मधुकर देसाई, उमेश पेडणेकर, अमित गौंडळकर, नागेश जगताप, संजू शिरोडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महायुती करायची की स्वबळावर लढायचे, याबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. मात्र, कार्यकर्त्यांची मागणी स्वबळावर लढण्याची आहे.महेश सारंग, सरचिटणीस- भाजपा सिंधुदुर्ग