सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या 20 कंत्राटी सफाई कर्मचार्यांवर बेमुदत संपात सहभाग घेतल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. ‘रोजगार सेवा सहकारी संस्था’ या कंत्राटदार संस्थेने या कर्मचार्यांना सेवेतून काढून टाकले आहे. सावंतवाडी शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाचे काम ‘रोजगार सेवा सहकारी संस्था’ या संस्थेकडे आहे. संस्थेने नेमलेल्या कंत्राटी कर्मचार्यांच्या कामाच्या अटी व शर्तींमध्ये कोणत्याही प्रकारच्या संपात सहभागी न होण्याचा स्पष्ट उल्लेख होता. मात्र, या अटींचा भंग करत काही कर्मचार्यांनी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025 मध्ये बेमुदत संप पुकारला होता.
संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब दिनकर घाडगे यांनी या कर्मचार्यांना दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, वेळेवर पगार, पीएफ आणि ईएसआयसीची रऊवम खात्यात जमा होत असतानाही कर्मचार्यांनी संप पुकारला. त्यामुळे सणासुदीच्या काळात शहरात कचर्याची समस्या निर्माण झाली आणि नागरिकांना त्रास झाला.
रोजगार सेवा सहकारी संस्थेने आपल्या पत्रात म्हटले आहे की, कर्मचार्यांनी अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे नगरपरिषदेने संस्थेवर दंडात्मक कारवाई केली आहे किंवा करणार आहे. त्यामुळे 15 सप्टेंबर 2025 पासून या कर्मचार्यांची सेवा समाप्त करण्यात येत आहे. तसेच, संस्थेला झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून सप्टेंबर महिन्याच्या पगारातून दंड कापून घेतला जाईल. या 20 कर्मचार्यांच्या जागी नवीन कामगारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे आगामी काळात सफाई कर्मचार्यांच्या प्रश्नावर संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.