हरिश्चंद्र पवार
सावंतवाडी ः सावंतवाडी नगरपालिका निवडणूक माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरत असून या निवडणुकीदरम्यान शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मागील निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी स्वत: लक्ष घातला होता आणि ही निवडणूक जिंकली होती. दरम्यान जिल्ह्यातील आगामी सावंतवाडी, वेंगुर्ले, कणकवली आणि मालवण या चार नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने विजयी उमेदवार कोण असणार हे महिला मतदार ठरवणार आहेत.
चारही ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाचे भवितव्य महिला मतदारांच्या हाती असल्याने, राजकीय पक्षांना आपल्या प्रचाराची दिशा बदलावी लागणार आहे. निवडणुकीत यश मिळवण्यासाठी उमेदवारांना महिलांच्या समस्या आणि गरजांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. महिलांसाठीच्या सोयी-सुविधा, सुरक्षा आणि विकासाच्या मुद्द्यांवर भर देणार्या उमेदवारांना महिला मतदार अधिक पसंती देतील. या वाढलेल्या महिला मतदारांच्या संख्येमुळे, उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचाराच्या धोरणापर्यंत सर्वत्र महिला-केंद्रित धोरण ठेवावे लागेल. थोडक्यात, सिंधुदुर्गातील या चारही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात ‘लेडीज फर्स्ट’ हेच समीकरण निर्णायक ठरणार आहे.
तब्बल तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद निवडणुका जाहीर केल्याने राजकारणाला वेग आला आहे. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्यामुळे आता शहरातील प्रथम नागरिक कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नगर परिषदेच्या प्रभाग रचनेत बदल करण्यात आला असून, आता दहा प्रभाग करण्यात आले आहेत. या दहा प्रभागातून वीस उमेदवार निवडून दिले जातील. (यापूर्वी ही संख्या 17 होती) नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. मतदार संख्या:शहरात एकूण 19,429 मतदार असून, प्रभाग दोनमध्ये सर्वाधिक 2334 आणि प्रभाग सहामध्ये सर्वात कमी 1529 मतदार आहेत.
महायुतीत धुसफूस; तिरंगी लढतीची शक्यता
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी निवडणूक जाहीर होताच पहिल्याच दिवशी स्वबळाचा नारा दिला. यामुळे निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कमी कालावधी मिळाल्यास बंडखोरीची भीतीही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
पक्ष/आघाडी इच्छुकांच्या नावाची चर्चा ः भाजप-श्रद्धाराजे भोंसले (सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी), माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मोहिनी मडगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून संजना परब (जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या पत्नी), अॅड. नीता सावंत कविटकर (जिल्हा महिला आघाडी प्रमुख), अनारोजीन लोबो, माजी नगरसेविका साक्षी कुडतरकर, अॅड. नीता गावडे, भारती मोरे यांची नावे पुढे आली आहेत.
राष्ट्रीय काँग्रेस तर्फे साक्षी वंजारी यांचे नाव पुढे आले होते. आता ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार म्हणून सीमा मठकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. युती फिसकटली तर ऐनवेळेला शिंदे सेनेकडून माजी नगराध्यक्षा आणि आमदार दीपक केसरकर यांच्या सुविद्य पत्नी पल्लवी केसरकर यांच्या नावाची सुद्धा घोषणा होऊ शकते.
ही निवडणूक प्रशासक नेमल्यानंतर तीन वर्षांनी होत आहे. त्यामुळे ही निवडणूक माजी शालेय शिक्षणमंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यांवर अवलंबून असणार आहे. यापूर्वी पोटनिवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष म्हणून 729 दिवसांचा कारभार केलेले आणि सध्या शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले संजू परब यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. एकंदरीत, नगराध्यक्षपदाचे आरक्षण महिलेसाठी झाल्याने, तसेच स्वबळाचा नारा आणि महायुतीतील संभाव्य धुसफूस यामुळे सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. आणि यामध्ये माजी शालेय शिक्षणमंत्री व आमदार दीपक केसरकर आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.