सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव तसेच परिसरातील गावांमध्ये गेले अनेक दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. दिवसा वीज खंडित होतेच परंतु अलीकडे रात्री-बेरात्री सुद्धा वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. शिवाय अनेकवेळा कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने घरगुती विद्युत उपकरणे नादुरूस्त होत आहेत. यासाठी जीर्ण वीज खांब बदलणे, लोंबकळणार्या वाहिन्या सुस्थितीत करणे, वाहिन्यांवर फांद्या तोडणे, आदी कामे प्राधान्याने करावीत, अशी मागणी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांच्याकडे वीज ग्राहक संघटना पदाधिकार्यांनी केली.
विजेच्या खेळखंडोबामुळे परिसरातील ग्राहकांना, व्यवसायिकांना तसेच विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याकडे या पदाधिकार्यांनी श्री. राक्षे यांचे लक्ष वेधले. उपकार्यकारी अभियंता श्री. राक्षे यांनी येत्या दहा दिवसात मळगाव येथील वीज समस्या सोडवून अखंडित वीज पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले. सहा. अभियंता श्री. खांडेकर, जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, सचिव दीपक पटेकर, संजय तांडेल, प्रमोद राऊळ, सहदेव राऊळ, राजू निरवडेकर, राजन राऊळ, स्वप्नील ठाकूर आदी उपस्थित होते.याबाबत वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड म्हणाले, सावंतवाडी शहरालगतची मोठी बाजारपेठ म्हणून मळगाव ओळखले जाते. परंतु मळगाव येथील व्यापारी, उद्योजक, घरगुती वीज ग्राहक अनेक समस्यांनी बेजार आहेत.
बाजारपेठेतील दत्त मंदिर जवळील तसेच शिवाजी चौकातील खराब झालेले वीज खांब तातडीने बदलून 9 मीटरचे लोखंडी खांब बसविणे आवश्यक आहे. घाटातील जंगलमय भागात रात्री -अपरात्री वारंवार खंडित होणारी वीज, कमी दाबाचा वीज पुरवठा या सर्व समस्यांचे योग्य निराकरण व्हायचे असेल तर लवकरात लवकर मळगाव पंचक्रोशीत सब स्टेशन उभारणे आवश्यक आहे. या सर्व विषयांवर उपकार्यकारी अभियंता व सहा. अभियंता यांच्याशी समाधानकारक चर्चा झाली आहे.
मळेवाड येथून येणारी लाईन दहा दिवसात पूर्ण करून घेण्यासह आवश्यकजागी नवीन लोखंडी खांब उभारण्याचे आश्वासन श्री. राक्षे यांनी दिले आहे. सबस्टेशन बाबतच्या तांत्रिक बाबी दूर झाल्यास ते सुद्धा मार्गी लावण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे, अशी माहिती श्री. लाड यांनी दिली.