सावंतवाडी : सावंतवाडीतील समाज मंदिराच्या बाजूच्या एका इमारतीत असलेल्या साहस प्रतिष्ठान दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या दिव्यांग मुलांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इमारतीला दरवाजे नसल्याने हा प्रकार घडला. सुदैवाने शिक्षकांनी सतर्कता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली.
या प्रशिक्षण केंद्राची पूर्वीची जागा दुरुस्तीसाठी बंद असल्याने, संस्थेच्या सदस्या रूपा गौंडर-मुद्राळे यांच्या प्रयत्नांमुळे हे केंद्र समाज मंदिराच्या बाजूच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले होते. माजी नगरसेवक तानाजी वाडकर यांनी यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र, या इमारतीला दरवाजे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी गुरे आणि कुत्रे आतमध्ये शिरतात. दोन दिवसांपूर्वी वर्गात मुले प्रशिक्षण घेत असताना अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
इमारतीमधील शौचालय आणि स्नानगृह पूर्णपणे मोडकळीस आले आहेत, ज्यामुळे दिव्यांग मुलांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच, इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. संस्थेच्या सदस्या रूपाली गौंडर यांनी पुन्हा माजी नगरसेवक तानाजी वाडकर यांच्याकडे या समस्या मांडल्या.