Sawantwadi  
सिंधुदुर्ग

सावंतवाडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अधांतरीच!

Sawantwadi Shivaji Maharaj statue- ५ वर्षे उलटूनही साधी वीटही रचली नाही

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडीः मुंबई जवळील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे काम कायदेशीर आणि न्यायालयीन पेचप्रसंगामुळे रखडलेले असताना, आता तशीच काहीशी परिस्थिती सावंतवाडी शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित पुतळ्याच्या बाबतीत निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, अरबी समुद्रातील स्मारकाला न्यायालयीन स्थगितीचे कारण आहे; मात्र सावंतवाडीतील पुतळ्याच्या कामासाठी कोणत्याही प्रकारचा कायदेशीर अडथळा नसताना गेल्या पाच वर्षांत या प्रकल्पाची एकही वीट अद्याप लागली नसल्याने स्थानिक शिवप्रेमींमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. सन २०२१ च्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी नगरपरिषदेच्या शिव उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ अत्यंत थाटामाटात करण्यात आला होता.

पुतळ्याच्या चौथऱ्याच्या निर्मितीसाठी प्राथमिक स्वरूपात नगरपरिषदेकडून ३ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि त्यासाठी वर्क ऑर्डर सुद्धा काढण्यात आली होती. तत्कालीन नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या कार्यकाळात या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता होती आणि आजच्या घडीलाही नगरपरिषदेवर भाजपचीच सत्ता आहे.

तत्कालीन नगराध्यक्ष संजू परब यांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला असून ते सध्या शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे संयुक्त महायुती सरकार सत्तेत आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे हे सुद्धा भाजपचे आहेत. अशा प्रकारे राजकीय व प्रशासकीय बळ पाठीशी असतानाही या पुतळ्याचे काम का रखडले? असा शिवप्रेमींचा सवाल आहे.

सावंतवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या बाबतीत कोणतीही न्यायालयीन स्थगिती, पर्यावरणीय अडथळा किंवा तांत्रिक अडचण नाही. तरीही पाच वर्षे उलटूनही कामाला सुरुवात न होणे ही प्रशासकीय अनास्था असल्याची टीका होत आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचीजी अवस्था झाली तशीच अवस्था सावंतवाडीतील शिवउद्यानातील पुतळ्याची होणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

पुतळ्याबाबत मासिक सर्वसाधारण सभेत चर्चेची अपेक्षा

सावंतवाडी नगरपरिषदेच्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मिती बाबत चर्चा होणे अपेक्षित आहे. ही मासिक सर्वसाधारण सभा सोमवार १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. या सभेत हा विषय यावा आणि यावर चर्चा होऊन निर्णय व्हावा, अशी अपेक्षा शिवप्रेमींकडून व्यक्त होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT