सावंतवाडी : सावंतवाडी शहरात महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद असल्यामुळे पोलिसांच्या तपासात मोठा अडथळा निर्माण होत आहे. नुकत्याच घडलेल्या एका चोरीच्या घटनेमुळे ही बाब समोर आली आहे. यामुळे शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सावंतवाडी शहरातील लक्ष्मीनगर परिसरात एका वृद्ध महिलेला फसवून तिचे दागिने चोरल्याची घटना घडली. महिलेने दागिने रुमालात गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दोन तरुणांनी तिची फसवणूक करून तिला लुबाडले. ही घटना होऊन दोन दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपींचा शोध लावण्यात यश आलेले नाही. या तपासात सीसीटीव्ही फुटेजची मदत होईल, अशी अपेक्षा होती, पण शहरात बसवलेले बहुतांश कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना कोणतेही फुटेज मिळू शकले नाही. सीसीटीव्ही बसवण्यासाठी निधी उपलब्ध, पण देखभालीसाठी निधी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
आ. दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शहरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी शहरातील प्रमुख ठिकाणी हे कॅमेरे बसवले. हे कॅमेरे थेट सावंतवाडी पोलिस ठाण्याला आणि जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला जोडलेले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून या कॅमेर्यांची देखभाल करणार्या कंपनीने लक्ष न दिल्याने बहुतांश कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे शहरात घडणार्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी बसवण्यात आलेला हा ‘तिसरा डोळा’ निष्प्रभ ठरला आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे शहरातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे शहरात घडणार्या घटनांवर लक्ष ठेवता येते असे सांगतात, पण प्रत्यक्षात महत्त्वाच्या वेळीच कॅमेरे बंद असल्याने त्यांचा काहीही उपयोग होत नाही. यामुळे पोलिसांच्या तपासावरही परिणाम होत आहे.