सावंतवाडी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीमुळे एक मोठा गट थेट शिंदे सेनेतप्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला भागातील असंख्य माजी आणि सध्याचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच विविध मोर्चांचे प्रमुख लवकरच शिंदे गटात सामील होणार आहेत. या संदर्भात सावंतवाडीतील एका पर्यटन गावात नुकतीच एक महत्त्वपूर्ण गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक दिग्गज नेते, माजी लोकप्रतिनिधी आणि भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या बैठकीत शिंदे सेनेतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याचे आणि त्यानंतरच पक्षप्रवेशाचा निर्णय पक्का झाल्याचे समजते.
गेल्या काही काळापासून भाजपच्या स्थानिक नेतृत्वात अंतर्गत वाद सुरू आहेत. कार्यकर्त्यांना योग्य तो मान मिळत नाही, निर्णयाधिकार काही मोजक्या लोकांच्या हातात केंद्रीत झाले आहेत, आणि पक्षाला आतून पोखरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप नाराज कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे, भाजपमधील अविश्वासाचे वातावरण शिगेला पोहोचले आहे. याच कारणामुळे अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात गेल्यास अधिक मान-सन्मान आणि काम करण्याची मोकळीक मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरू शकते. भाजपच्या संघटनेला पडलेले हे मोठे भगदाड ते कसे रोखणार हा प्रश्न आहे. जर हा नाराज गट खरोखरच बाहेर पडला, तर आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो, ज्यामुळे त्यांना सावंतवाडी मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आपला प्रभाव गमावण्याची भीती आहे.
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद केवळ सावंतवाडीपुरती मर्यादित न राहता दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातही प्रचंड वाढणार आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे सेनेला बळ मिळणार आहे. भाजपसमोर निर्माण झालेल्या या आव्हानामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
या घडामोडींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार हे निश्चित आहे. आतापर्यंत सावंतवाडी मतदारसंघात मजबूत संघटन असल्याचा भाजपला अभिमान होता, मात्र आता हा गड कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपचा पारंपरिक मतदार आणि कार्यकर्तेच जर बाहेर पडले तर आगामी निवडणुकांमध्ये भाजपला उमेदवार उभा करणेही कठीण होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींवर आता भाजप पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.