

सावंतवाडी : भाजपमधील जे कोणी पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक असतील तर त्यांना जरूर घ्या, त्यासाठी तुम्हाला आठ दिवसांवी मुदत देतो, या कालावधीत तुम्ही भाजपा कार्यकर्त्यांचे प्रवेश घेऊन दाखवा, असे थेट आव्हान भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांना दिले. संजू परब आपले राजकीय गुरू नारायण राणे यांचा पक्ष फोडण्याचे काम करत असतील तर ते योग्य आहे काय? असा सवाल त्यांनी केला. यापुढे येणार्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करत तसा अहवाल आपण भाजपा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेची काही मंडळी महायुतीत ‘मिठाचा खडा’ टाकण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
श्री. सारंग म्हणाले, शिवसेना पदाधिकार्यांना भाजपा कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष वाढवायचा असेल तर येत्या आठ दिवसात त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना खुलेआम शिवसेनेत घ्यावेत, नव्हे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश घेऊन दाखवाच, असे आव्हान देत प्रसंगी आम्ही पुन्हा शून्यातून पक्ष उभा करू, असे प्रत्युत्तर महेश सारंग यांनी दिले.
संजू परब हे नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावरच निवडणून आले होते, याची त्यांनी जाणीव ठेवावी व नारायण राणे यांचे नाव पुढे करून शिंदे सेनेच्या नेत्यांनी भाजपा कार्यकर्त्यांची दिशाभूल करू नये, आम्ही पक्षाध्येक्ष मानणारे कार्यकर्ते आहोत, असा टोला त्यांनी लगावला.
श्री. सारंग पुढे म्हणाले, भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. येथे संघटन कौशल्याला अधिक महत्त्व दिले जाते.मात्र संजू परब यांनी भाजपमध्ये काम करूनही त्यांना याची माहिती नाही, हे दुर्दैव आहे. त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यावर टीका करताना विचार केला पाहिजे होता. आता भाजपचे कार्यकर्तेही स्वबळावर निवडणूका लढवण्यास तयार आहेत. तेव्हा येणार्या निवडणुकामध्ये कोणाची कुठे ताकद आहे, हे दिसून येईल.त्यामुळे परब यांनी भाजप फोडण्याचे काम आठवड्यात पूर्ण करून दाखवावेच, असे ते म्हणाले.
खा. नारायण राणे हे महायुतीचे खासदार असले तरी ते प्रथम भाजपचे नेते आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचे नाव पुढे करून शिंदे सेनेच्या नेत्यांनी दिशाभूल करू नये. भाजप हे मोठे संघटन आहे. त्यात कुठला निर्णय घ्यायचा असेल तर सर्व पातळ्यांवर चर्चा करून घेतला जातो. त्यामुळे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे पत्र पाठवले, त्याचा संदर्भ कदाचित खा.राणे यांना त्यांनी दिला असेल, असे श्री. सारंग म्हणाले. मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यामागचा सूत्रधार कोणीतरी वेगळा आहे, असे संजू परब म्हणत असतील तर त्यांनी त्याचे नाव जाहीर करावे, असे आव्हान सारंग यांनी दिले.
खा. नारायण राणे हे ‘कमळ’ या भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत, मात्र आ. दीपक केसरकर यांना आम्ही भाजपाने निवडून दिले आहे.भाजपाच्या पदाधिकार्यांनी मोठी मेहनत घेतली आणि आम्ही त्यांना निवडून दिले आहे याचे भान त्यांनी ठेवावे आणि स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे असेही सारंग म्हणाले. भविष्यात शिवसेनेचे भवितव्य शून्य असेल अशी टीका करत भाजपचे कार्यकर्ते अन्यत्र जाणारच नाहीत तर तुम्ही त्यांना घेणार काय? असा सवाल त्यांनी संजू परब यांना केला.