सावंतवाडी : आरोंदा- हुसेनबाग येथे जमीन खरेदी-विक्री व्यवहारातून मच्छीमार बांधवांना बेघर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात येथील मच्छीमार बांधवांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली आरोंदा मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष गोकुळदास मोटे यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन आपली सामूहिक हरकत नोंदवण्याची मागणी केली आहे.
आरोंदा -हुसेन बाग येथील मच्छीमार शिवराम कोरगावकर, रामदास पेडणेकर, प्रथमेश नवघरे, दीनानाथ पेडणेकर, तुकाराम कोरगावकर, हरिश्चंद्र कोरगावकर, रघुवीर पेडणेकर, अनंत चांदेकर, पांडुरंग कोरगावकर, भरत कोरगावकर, संतोष कोरगावकर, बळवंत शिरवलकर, दया मोटे आदी उपस्थित होते. आरोंदा -हुसेनबाग येथे मच्छीमार बांधव राहत असलेल्या जमिनीची विक्री झाली आहे. या जमिनीमध्ये कुळ म्हणून नोंद असलेल्या व्यक्तीने मालकी दाखवून ‘लाभ’ नामक कंपनीशी व्यवहार केला आहे.
मच्छीमार बांधवांचे म्हणणे आहे की ते या जमिनीवर संस्थान काळापासून सुमारे 400 वर्षांपासून वास्तव्यास आहेत आणि तत्कालीन संस्थांनकडून त्यांना ही जमीन देण्यात आली होती. या जागेवर सुमारे 15 मच्छीमार कुटुंबांची घरे असून ज्या जागेवर त्यांची घरे आहेत, त्याचा सातबारा त्यांच्या नावावर आहे. मात्र, इतर जमिनीमध्ये कुळ म्हणून असलेल्या व्यक्तीने सातबारावर मालकी दर्शवून ही जमीन विकली आहे. त्यामुळे संबंधित कंपनी या मच्छीमार बांधवांना घरे अनधिकृत ठरवून दुसरीकडे स्थलांतरित करण्याची धमकी देत आहे.
याबाबत मच्छीमार बांधवांनी आरोंदा तलाठ्याकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची तक्रार स्वीकारली गेली नाही आणि फेरफारची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे उत्तर त्यांना देण्यात आले. त्यामुळे त्रस्त झालेल्या मच्छीमार बांधवांनी ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून तहसीलदारांची भेट घेतली. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी तात्काळ आरोंदा तलाठ्यांशी संपर्क साधून मच्छीमार बांधवांच्या हरकती स्वीकारण्याचे निर्देश दिले. या लढाईत ठाकरे शिवसेना मच्छीमार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून त्यांना बेघर करण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशारा रुपेश राऊळ यांनी दिला.
मच्छीमार बांधवांच्या पाठीशी कोणी नाही, राज्यकर्ते आपल्या सत्तेच्या मस्तीत आहेत. आमचा प्रश्न कोण सोडवणार, आम्हाला बेघर करणार्यांना कोण रोखणार? असा सवाल आरोंदा मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष गोकुळदास मोटे यांनी केला. ते म्हणाले, राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आरोंदा येथे येऊन आमची कैफियत ऐकावी आणि यावर तोडगा काढावा. अशी मागणी त्यांनी केली..