सिंधुदुर्ग

सावंतवाडी : राजवाडा येथे झाड अंगावर कोसळून अंजिवडेतील २ जण ठार

निलेश पोतदार

सावंतवाडी, पुढारी वृत्तसेवा काल (मंगळवार) सायंकाळी झालेल्या तुफान पावसामुळे सावंतवाडी राजवाडा परिसरात भले मोठे भेडले माडाचे झाड कोसळले. हे मोठे झाड अंगावर पडल्यामुळे अंजिवडे येथील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वीज वाहिन्यांचा स्पर्श झाल्याचा संशय आहे. ही घटना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राजवाड्याच्या बाजूला असलेल्या परिमल टॉवर समोर घडली. राहुल प्रकाश पंदारे (वय २४) व संभाजी दत्ताराम पंदारे (वय २१) रा. गवळीवाडी अशी या दोघांची नावे आहेत. गोठण परिसरात राहत असणारे दशावतार कलाकार गौरव शिर्के यांच्या सोबत भजनासाठी ते आले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडला.

मृत्‍यूमुखी पडलेले दोघेही युवक गोठण येथे भजनासाठी आले होते. तेथून दुचाकीने परत जात असताना त्यांच्या अंगावर भेडले माडाचे झाड कोसळले. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी तात्काळ नगरपरिषद व पोलिसांना ही खबर दिली. त्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पालिकेचा अग्निशमन बंब व रुग्णवाहिका दाखल झाली. कटरच्या साह्याने झाड कापून त्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु अंगावर झाडाचा मोठा भाग कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर झाडाखाली अडकलेला १ मृतदेह बाहेर काढण्यात आला.

अपघात झाल्याचे लक्षात येतात त्या ठिकाणी माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रवी जाधव, रॉक्सन डान्टस, बाबा अल्मेडा, डॉ. मुरली चव्हाण, हेमंत पांगम, विनायक गावस, लादु रायका, मोसीन मुल्ला, ॲलेक्स डिसोजा, आशिष रायकर, अखिलेश कोरगावकर सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, आरोग्य निरीक्षक वैभव नाटेकर, नंदू गावकर आदींनी त्या ठिकाणी मदत कार्यात सहभाग घेतला. कटरच्या साह्याने झाड कापून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी व रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, अमित गोते, सुरज पाटील, आदींनी त्या ठिकाणी धाव घेऊन सहकार्य केले. दरम्यान यावेळी सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली.

नशिबाने घात केला…!

याबाबत गौरव शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, भजन आटोपल्यानंतर शिर्के यांनी त्या दोघांना राजवाड्याच्या पुढील न्यायालयाच्या तिठ्यावर सोडले आणि गौरव हॉटेल पॉपस च्या बाजूने ते निघून गेले. दरम्यान त्यांना अपघात झाल्‍याचे कळाले. त्यामुळे ते परत आले. यावेळी राहुल याची दुचाकी अपघातग्रस्त झालेली दिसली. ते पुन्हा का परतले? हा मात्र आपल्याला प्रश्न पडला, असे सांगून त्यांच्या नशिबानेच हा घात केला, अशी प्रतिक्रिया त्‍यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT