विराज परब
बांदा : इन्सुली-बांदा परिसरातील ‘ओंकार’ हत्तीला वनतारा प्रकल्पात हलविण्याच्या तयारीमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट असून, कोकण-गोवा परिसरातील नागरिक, युवक संघटना, पर्यावरणप्रेमी आणि रीळ स्टार इन्फ्लुएन्सर्स मोठ्या प्रमाणात पुढे सरसावत आहेत. ‘ओंकार’ हा कोकणचा राखणदार असून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासातून दूर नेऊ नये, अशी ठाम मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियावर हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होत असून, आंदोलनाला सर्वत्र व्यापक समर्थन मिळत आहे.
‘ओंकार’ला मादी हत्तीची गरज असून त्यामुळे त्याला ‘वनतारा’ प्रकल्पात न्यायला हवे,असा युक्तिवाद वनविभागाकडून करण्यात येत आहे. मात्र या दाव्यावर ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी यांनी आक्षेप घेतला आहे. ‘मादी हत्तीची गरज असल्यास मादीला जिल्ह्यात आणून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडा. त्यासाठी ‘ओंकार’चा अधिवास बदलण्याचे कारण नाही. त्याचं कुटुंब इथेच निर्माण करा, पण त्याला जंगलातून दूर नेऊ नका, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
ओंकारचा स्वभाव शांत असून, गावकर्यांच्या मते तो कोणत्याही प्रकारचे आक्रमक वर्तन करत नाही. लोक अगदी 4-5 फूटांवर उभे असतानाही तो चिडत नाही. ‘आम्ही रोज पाहतो, ‘ओंकार’ शांत आहे. मग वनविभागाला तो आक्रमक का दिसतो? फटाके फोडून, आवाज करून त्याला मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न केला जातोय का? असा थेट सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान ओंकारसाठी आवाज उठवणार्या काही युवकांना ‘अडकवण्याचे प्रयत्न चालू आहेत’ अशी चर्चा असून, त्यामुळे संताप वाढला आहे. परंतु या सर्व प्रयत्नांना न जुमानता युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत.‘ओंकार हा केवळ एक हत्ती नाही; तो आमच्या कोकणच्या भावनांचा अविभाज्य भाग आहे,’ असे नागरिकांचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर ओंकारच्या बचावासाठी सुरू झालेले जनमोहीम आता व्यापक रूप धारण करत असून शेकडो रील, पोस्ट आणि संदेशांनी राज्यभर जागरूकता वाढत आहे. ओंकारच्या बचावासाठी साथ देणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
इन्सुलीबांदा परिसरातील तरुण रील स्टार, व्लॉगर्स, इन्फ्लुएन्सर्स यांनी स्वतः पुढे येत ‘ओंकार’साठी ऑनलाईन आंदोलन पेटवले आहे. शेकडो रील, भावनिक व्हिडिओ, मुलाखती, पिके उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांच्या भावना या सर्वातून एकच माहिती पुढे येतेय, ‘ओंकार’ आमचा आहे तो कुठेच जाणार नाही.”