सतीश सावंत (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Manikrao Kokate Issue | हमीभाव नाही; रमी खेळून पैसे मिळवायचे का?

Thackeray Shiv Sena Leader | ठाकरे शिवसेना नेते सतीश सावंत यांचा कृषिमंत्र्यांना टोला

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना राज्यातील शेतकर्‍यांबद्दल कसलीही आस्था नाही. माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहात रम्मी खेळत असतानाचा त्यांचा व्हिडीओ प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाला आहे. राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जात नाही, फळपिक विम्याचे पैसे दिले जात नाहीत, शेतमालाला हमीभाव मिळत नाही त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांनी देखील आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रमी खेळून पैसे मिळविण्याचा संदेश कृषिमंत्री देत आहेत का? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सतीश सावंत पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी शेतकर्‍यांची कर्जमाफी करू, पीक विम्याचे पैसे देऊ, फळपीक विम्याचे पैसे देऊ, शेतमालाला हमीभाव देऊ अशा प्रकारची आश्वासने महायुतीने शेतकर्‍यांना दिली होती. मात्र यातील एकही आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही. शेतमालाला देखील हमीभाव मिळत नाही. महायुती सरकारमध्ये समन्वय नाही, सरकारला शेतकर्‍यांबद्दल आस्था नाही, शेतकर्‍यांना त्रास देण्याचे काम सरकार करत आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी कृषी मंत्री रमी खेळत आहेत. त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याची बदनामी होत आहे. मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घेऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशा कृषीमंत्र्यांचा आम्ही शेतकर्‍यांच्या वतीने जाहीर निषेध करतो.

त्यासोबत काल अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी छावा संघटनेतील शेतकर्‍यांच्या मुलांना मारहाण केली त्याचा देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो, असे सतीश सावंत यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT