

सावंतवाडी ः गोवा-पेडणे येथे टॅक्सी चालकावर हल्ला करून सावंतवाडी शहरातील घरफोडीचा प्रयत्न करत मोटारसायकल चोरी करून पलायन केल्याच्या गुन्ह्यात सहभाग आणखी एकाला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने तुळजापूर येथून ताब्यात घेतले. अजय सुनील भोसले (वय 27, रा. तुळजापूर) असे या संशयिताचे नाव आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित ‘हाड्या व गुड्या’ यांचा तो प्रमुख साथीदार आहे. शुक्रवारी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता 21 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गोवा -पेडणे येथे टॅक्सी चालकावर हल्ला करून संशयित चोरटे सावंतवाडी शहरात आले होते. मध्यरात्री त्यांनी दोन मोटरसायकल, दोन मोबाईल चोरत एका घरात चोरीचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकार्यांनी अधिक तपास करत शंकर मधुकर पवार उर्फ हाड्या (25), राजू मधुकर पवार उर्फ गुडया (24, दोन्ही राहणार ता.मोहोळ, जि.सोलापूर) या दोघांना सुरुवातीला बेंगलोर येथून अटक केली होती. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. तर याच गुन्ह्यात सहभाग असलेला अजय भोसले याला शुक्रवारी तुळजापूर येथे अटक करण्यात आली, त्यालाही न्यायालयाने 21 पर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेमुळे या दोन्ही गुन्ह्यांतील काही नवे धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
चोरीतील मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत तर दोन मोबाईल हस्तगत करणे अद्याप बाकी आहेत. एकूण सहा जणांचा या गुन्ह्यात सहभाग आहे. तिघांना अटक करण्यात आली असून उर्वरित तिघे अद्याप फरार आहेत. त्यांचा स्थानिक गुन्हे शाखा व पेडणे पोलिस शोध घेत आहेत.