सातार्डा पूलाची पाहणी करताना सुधा कवठणकर. सोबत नामदेव गोवेकर, साई कवठणकर आदी.
सावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडणार्या सातार्डा-न्हयबाग मार्गावरील पूल अत्यंत धोकादायक बनला आहे. या पुलाला अनेक ठिकाणी मोठे तडे गेले असून, तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या हजारो प्रवाशांना, विशेषतः कामासाठी दररोज ये-जा करणार्या तरुण-तरुणींना आणि पर्यटकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या पुलाचे संरक्षक कठडे पूर्णपणे जीर्ण झाले असून त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. सन 2016 मध्ये सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेची आठवण करून देत, स्थानिक नागरिकांनी या पुलाच्या बाबतीतही तशीच घटना घडण्याची भीती व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर यांनी या गंभीर परिस्थितीकडे पालकमंत्री नीतेश राणे आणि स्थानिक आ. दीपक केसरकर यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावर केवळ तात्पुरती मलमपट्टी करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले आहे, असा आरोप श्री. कवठणकर यांनी केला आहे. आठ दिवसांच्या आत या पुलावर ठोस उपाययोजना करून मार्ग सुरक्षित करण्याची मागणी त्यांनी केली आहे; अन्यथा ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
संतोष गोवेकर, नामदेव गोवेकर, साई कवठणकर, सदू टेमकर, यामेश्वर कवठणकर, निखिल कवठणकर, सुप्रेश कवठणकर, गिरीश परब, प्रवीण बर्वे, अनिकेत धारगळकर, यश उर्फ दया कवठणकर, प्रमोद कवठणकर, स्वप्निल हरमलकर, संजय पालव, रघुनाथ जाधव, जयेश पोळजी, माजी उपसरपंच तळवणे आपा बर्डे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.