सावंतवाडी : भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेली तक्रार म्हणजे केवळ शिवसेनेचे नेते आमदार दीपक केसरकर आणि आमदार नीलेश राणे यांना संभाव्य मंत्रिपद मिळू नये म्हणून रचलेले ‘तक्रारनाट्य’ आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला आहे.
आमच्यावर आरोप करण्यापेक्षा भाजप जिल्हाध्यक्षांनी आपले कार्यकर्ते सांभाळण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. आम्ही केवळ आमदार केसरकर यांच्या शब्दाखातर शांत आहोत, आमच्यावर दबाव टाकल्यास दुप्पट नव्हे, तर तिप्पटीने कार्यकर्ते शिवसेनेत घेऊ, असा खणखणीत इशाराही परब यांनी दिला.
मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष बबन राणे, शहराध्यक्ष बाबू कुडतरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना प्रलोभने दाखवून भाजप कार्यकर्ते फोडत असल्याचा आरोप करत प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली होती. या आरोपांना उत्तर देताना संजू परब म्हणाले, खा. नारायण राणे यांना आम्ही राजकीय गुरू मानतो. त्यामुळे आमच्या काही चुका असतील तर तक्रार त्यांच्याकडे करायला हवी होती. मात्र थेट मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे जाण्यामागे केसरकर आणि राणे यांच्या मंत्रिपदाच्या मार्गात अडथळा आणण्याचे कुटील राजकारण आहे.
भाजपचे कार्यकर्ते लवचिक असतील तर ते आमच्याकडे येतात, यात आमचा काय दोष? तुम्ही आधी आत्मचिंतन करा, असे परब म्हणाले. आमदार केसरकरांच्या शब्दाला मान देऊन आम्ही पक्षप्रवेश थांबवले आहेत. त्यामुळे आम्ही महायुतीत मिठाचा खडा टाकत असल्याच्या आरोपात तथ्य नाही. भाजपने खुशाल आमचे कार्यकर्ते घेऊन दाखवावेत, आमचा प्रत्येक शिवसैनिक निष्ठावंत आहे आणि तो पक्ष सोडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. परब यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाजपची इच्छा असेल, तर त्यासाठी आम्हीसुद्धा तयार आहोत. यापूर्वी दोडामार्ग सोसायटीत शिवसेनेचे बळ भाजपला आम्ही दाखवून दिले आहे. त्यावेळी दोडामार्ग सोसायटीवर आपलाच विजय होणार असल्याच्या अविर्भावात गाडीच्या काचा बंद करून गेलेल्या भाजपच्या नेत्यांना नेलेले हार परत आणावे लागले होते, असा टोला परब यांनी लगावला.