नांदगाव: पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आयनल मणेरवाडी गावचा सुपुत्र संदेश सूर्यकांत चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली. भारतीय पोलीस क्रीडा मंडळ, नवी दिल्ली आयोजित गुजरात सुरत येथे होणाऱ्या क्रिकेट टूर्नामेंटसाठी ही निवड झाली आहे. ग्रामीण भागात टेनिस बॉल क्रिकेट खेळता खेळता इतकी उंची गाठणा-या संदेशने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपला कामगिरीचा ठसा उमटविल्याबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
शिक्षणशाळा कोळोशी -हडपिड हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असताना संदेशने अमर सेवा मंडळ आयनल मणेरवाडी संघातून शेतीच्या कोपऱ्यातील क्रिकेटमधून पहिले पाऊल टाकले, त्यानंतर उत्तम ईलेव्हन कोळोशी, श्री गांगेश्वर क्रिडा मंडळ, तरेळे , ज्युनिअर कॉलेज कणकवली येथे कामगिरीची झलक दाखवून अल्पावधीत लोकप्रिय बनले. यासाठी कै. सुनिल तळेकर, शेखर महाडिक यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. यानंतर ते मुंबई पोलीस संघात दाखल झाले. याठिकाणी दिपक पाटील यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले.
सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन १६ ते १९ वर्षाखालील टीमसाठी कर्णधार तसेच चार वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. १६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. एनसीए बेंगलोर एम आर एफ चेन्नई (डेनिस लिली सर) निवड मुंबई पोलीससाठी वीस वर्ष क्रिकेट खेळाडू व पोलीस क्रिकेट अकॅडमी प्रशिक्षण, मुंबई क्रिकेट असोसिएशन १९ व महेंद्रा ट्रॉफी २३ वर्षांखालील शालिनी भालेकर, एमसीए समर कॅम्प, कांगा लीग टूर्नामेंट , मॅच ऑबजरवर, बीसीसीआय टूर्नामेंट, मुस्ताक अली लायझन मॅनेजर बिहार टीम अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. इंग्लंड येथे वेमब्लि क्रिकेट क्लब कडून काउंटी स्पर्धेत त्यांनी प्रतिनिधित्व केले.