कुडाळ : बिबवणे-थोरला सडा परिसरात चंदनाच्या झाडाची चोरी करणार्या दोघांना वाडीवरवडे व बिबवणे ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून सुमारे 5 हजार रुपये किमतीचा चंदनाचा तुकडा, दोन मोटर सायकल ताब्यात घेत दोघांनाही पोलिसांनी अटक केली. रविवारी दुपारी 1 वा.च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यात अन्य दोघांचा सहभाग असून ते पळून गेल्याची चर्चा आहे.
याबाबत मिथिलानाथ गजानन राऊळ (57, बिबवणे-राऊळवाडी) यांनी कुडाळ पोलीसात दिली. बिबवणे-थोरलासडा येथे राऊळ कुटुंबियांची सामाईक बागायतीत चंदनांची झाडे आहेत. यातील काही झाडे अज्ञात चोरट्यांनी तोडून नेल्याचे श्री. राऊळ यांच्या निदर्शनस आले होते.सदर बागायत राऊळ यांच्या घरापासुन सुमारे तीन किमी अंतरावर जंगल परिसरात असल्याने आतापर्यत चोरटे सापडुन येत नव्हते.
दरम्यान 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास श्री. राऊळ हे बागायतीत गेले होते. त्यावेळी बागायतीत एका ठिकाणी कापडी शेड उभारल्याचे दिसून आले. श्री.राऊळ पुढे गेले असता त्या शेडजवळ झुडपातुन कुजबुज ऐकु आली. तसेच काहीतरी कापण्याचा आवाज ऐकु आला. कदाचित गवारेडे असतील या संशयाने ते पाहत असताना दोन व्यक्ती पळुन जाताना दिसल्या. राऊळ यांच्या सोबतचा असलेला कुत्रा देखील त्यांना पाहुन भुकुंन त्यांच्या मागे धावत गेला. यानंतर श्री. राऊळ यांनी झुडुपात जाऊन खात्री केली असता सुमारे एक चंदनाचे झाड मुळासकट कापल्याचे दिसून आले.
श्री. राऊळ यांची चाहूल लागल्याने चोरटे दीड फुटाचा सुमारे 5 हजार रु. किमतीचा तुकडा तेथेच टाकुन ते पळुन गेले. ही घटना श्री राऊळ यांनी आपल्या नातेवाईकांना फोनद्वारे दिली. यानंतर नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी शोध मोहिम राबवत दोन्ही चोरट्याना बिबवणे व वाडीवरवडे परिसरात पकडले. दरम्यान घटनास्थळ परिसरात दोन मोटरसायकल सापडून आल्या. ग्रामस्थांनी त्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या. पोलिसांनी चंदनाचा तुकडा व दोन मोटरसायकल सह या दोघांना ताब्यात घेत पोलीस स्टेशन येथे आणले. याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत कुडाळ पोलीस स्थानकात सुरू होती.