मळगाव : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सुमारे 2,500 मच्छीमारी नौका समुद्रात मासेमारी करतात. या मासेमारीकरता या नौकांना मत्स्य व्यवसाय विभाग टोकन देते. मात्र अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र कमालीचा खवळला असून हवामान विभागाने 8 ऑक्टोबरपर्यंत धोक्याचा इशारा दिला आहे. यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाने समुद्रात मासेमारीसाठी मच्छीमार नौकांना टोकन देणे बंद केले आहे.
तरीही जीव धोक्यात घालून काही मच्छीमार समुद्रात जाऊन मासेमारी करीत आहे. त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी मत्स्य विभागाकडे अपुरी यंत्रणा असल्याचे सिंधुदुर्ग मत्सव्यवसाय विभागाचे सहा.आयुक्त यांनी सांगितलेे.
चार दिवसांपूर्वी शिरोडा - वेळागर येथे पर्यटनासाठी आलेल्या 7 पर्यटकांना समुद्री लाटांच्या अंतर्गत गतिमान प्रवाहामुळे जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असल्यामुळे जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. 8 ऑक्टोबर पर्यंत समुद्री हवामान प्रतिकूल असल्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याच्या सूचना बंदर विभाग तसेच जिल्हा प्रशासनाने मच्छीमारांना दिल्या आहेत. तसेच समुद्र वरून शांत वाटत असला तरी समुद्रांतर्गत धोकादायक हालचाली होत असल्याने पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या मच्छीमार नौकांना समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून अधिकृत टोकन (पास) दिला जातो. यासाठी मासेमारीसाठी समुद्रात जाण्याचे ठिकाण, किती दिवस समुद्रात मासेमारी करणार, नौकेवरील खालाशी व तांडेल यांची संख्या व अन्य काही बाबींची माहिती घेतली जाते. यासाठी किनार्यावरील प्रत्येक बंदर जेटीवर सागर पर्यवेक्षक नियुक्त असून त्यांच्याकडून प्रत्येक बोटीला हे टोकन दिले जाते. बोट मासेमारी करून परत बंदरात आली की हे टोकन पर्यवेक्षकाकडे परत जमा केले जाते. हे टोकन सोबत नसल्यास बोट अवैध मासेमारी करत असल्याचे मानून त्याला दंड केला जातो, शिवाय अशा परिस्थितीत बोटीला अपघात झाल्यास विमा भरपाई नाकारली जाऊ शकते.