सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : मामा वरेरकर नाट्यगृहात कलाकारांवर ‘जलधारा’!

पुढारी वृत्तसेवा

मालवण ः येथील मामा वरेरकर नाट्यगृहात बरसती रंगसरी या कार्यक्रमाप्रसंगी कलाकार कलाविष्कार सादर करत असतानाच नाट्यगृहाच्या रंगमंचावरील छप्पराच्या स्लॅबमधून कलाकारांच्या अंगावरच श्रावणसरीच्या जलधारा कोसळल्या आणि उपस्थित प्रेक्षकांसमोरच पालिका प्रशासनाची पोलखोल झाली. नगरपालिकेला देखभाल दुरुस्तीकडे लक्ष नसेल तर मालवणीतील नाट्यप्रेमी आंदोलनाची भूमिका घेतील, अशा शब्दांत उपस्थितीत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले मामा वरेरकर नाट्यगृह बचाव मोहीम हाती घेण्याचे आता कलाकारांबरोबरच नाट्यप्रेमी मालवणवासीयांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मालवण नगरपालिकेने 2003 मध्ये 2 कोटी 50 लाख रुपये खर्चून प्रशस्त असे मामा वरेरकर नाट्यगृह उभारले. मालवणात नाट्यगृह व्हावे यासाठी 1981 पासून प्रयत्न करण्यात येत होते. या नाट्यगृहासाठी जागेचे आरक्षणही ठेवण्यात आले होते. मात्र, मालवण नगरपालिका ही क वर्गातील नगरपालिका असल्याने हे नाट्यगृह उभारणे शक्य होत नव्हते. अशाही परिस्थितीत तत्कालीन उपनगराध्यक्ष सुबोधराव आचरेकर व माजी नगराध्यक्ष भाई पै यांनी नाट्यगृह बांधण्याचा धाडसी निर्णय घेतला. या नाट्यगृहासाठी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही शासनाकडून 50 लाखांचा निधी दिला होता. 2003 मध्ये हे नाट्यगृह पूर्ण होऊन उद्घाटन झाल्यावर हे जिल्ह्यातील अतिशय भव्य आणि सुसज्ज असे नाट्यगृह मानले गेले.

या नाट्यगृहाच्या रंगमंचाला कै. सुबोधराव आचरेकर रंगमंच, असे नावही देण्यात आले आहे. त्यानंतर अनेक गाजलेल्या नाटकांचे प्रयोग या नाट्यगृहात होऊन अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांनी या नाट्यगृहाचे कौतुकही केले. हे नाट्यगृह मालवणच्या नाट्य व सांस्कृतिक चळवळीचे महत्त्वाचे अंग बनले. आजही हे नाट्यगृह जिल्ह्यात अव्वल आहे. मात्र, या नाट्यगृहाच्या देखभाल दुरुस्तीकडे नगरपालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने या नाट्यगृहाची सध्या दुरवस्था झाली आहे. मोडलेल्या खुर्च्या, बिघडत राहणारी एसीची व्यवस्था, लाईट व फॅनमधील बिघाड, स्टेजवरील अडचणी, स्लॅबमधून होणारी गळती अशा विविध समस्यांनी या नाट्यगृहाला ग्रासले आहे. मात्र, दुरुस्तीबाबत प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे.

प्रेक्षकांमधून नाराजी

भर कार्यक्रमात गळती होऊन घडलेल्या प्रकाराबाबत कलाकारांसह उपस्थित प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गेले काही वर्षे नाट्यगृहाची दुरवस्था झाली असताना त्याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नाही, अशी टीका उपस्थितांनी केली. मामा वरेरकर नाट्यगृह हे मालवणची अस्मिता असून त्याची दुरुस्ती झालीच पाहिजे, या मागणीसाठी आंदोलनही केले जाईल, असे मत व्यक्त केले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT