‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू मार्गदर्शन करताना सोबत भाजप युवा नेते संदीप गावडे व अन्य. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Sairat Fame Actress Rinku Rajguru |मराठीत सांगलेला कळत नाय, मालवणीत सांगू?

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या उपस्थितीने सुंदरवाडी दहीहंडी उत्सव लक्षवेधी

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : भाजपा युवा नेते संदीप गावडे यांच्या पुढाकाराने आयोजित ‘सुंदरवाडी दहीहंडी’ महोत्सवाला सावंतवाडीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूनेही उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. रिंकू राजगुरूने तिच्या खास शैलीत ‘काय सावंतवाडीकर काय बरा मा’ आणि ‘मराठीत सांगलेला कळत नाय, मालवणीत सांगू?’ असे संवाद मालवणीत म्हणून उपस्थितांची मने जिंकली. तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडीकरांच्या उत्साहाचे कौतुक केले. रात्री उशिरापर्यंत मुंबई-ठाण्याबाहेर एवढ्या मोठ्या संख्येने लोक पहिल्यांदाच पाहिले, असे म्हणत त्यांनी सावंतवाडीकरांनी आपल्याला थक्क केल्याचे सांगितले. तसेच, संदीप गावडे यांच्या माध्यमातून सुरू असलेले संघटनात्मक काम कौतुकास्पद असून, त्यांना भविष्यात यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल कवयित्री कल्पना बांदेकर, युवा उद्योजक भार्गव धारणकर, मिहीर मठकर, पोलिस हवालदार अमित राऊळ, मालवणी कवी दादा मडकईकर, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर आदींचा सत्कार करण्यात आला. दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजक संदीप गावडे यांनी चाहत्यांचे तोंडभरून कौतुक केले दरवर्षी अशा प्रकारची विविध उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

युवकांनी धरला ‘झिंगाट’ गाण्यावर ताल

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांनी सुंदरवाडी दहीहंडी उत्सवात सहभागी होत सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आयोजकांचे, विशेषतः ‘संदीप गावडे’चे आभार मानले. सावंतवाडीत येऊन त्यांना खूप छान वाटले. येथील माणसे आपली वाटतात आणि लगेच एक जिव्हाळ्याचे नाते जोडले जाते, असे त्यांनी सांगितले. आपल्या माणसांसोबत दहीहंडी साजरी करण्याचा आनंद आणखीनच मोठा असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी युवकांनी झिंगाट गाण्यावर ताल धरला.

राजापूर-खडपडेचे जय हनुमान गोविंदा पथक विजेते

या वर्षीच्या दहीहंडी स्पर्धेत राजापूर-खडपडे येथील जय हनुमान संघविजेता ठरला. त्यांना 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर सावंतवाडी येथील महापुरुष भटवाडी संघाला दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. या व्यतिरिक्त, अमेय तेंडुलकर मित्र मंडळ, श्री रुद्र परुळे, शिवगर्जना बांदा, आडीवरे राजापूर गोविंदा पथक, वरचीवाडी राजापूर गोविंदा पथक अशा अनेक गोविंदा पथकांनी उपस्थिती लावून सलामी दिली. त्यांना प्रत्येकी 11 हजार 111 रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT