राजन तेली 
सिंधुदुर्ग

केसरकरांच्या विरोधात रान उठवणार!

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी ः मंत्री दीपक केसरकरांच्या विरोधात भूमिका घेत असल्यामुळे कारवाई होईल, माझ्यावर प्रेशर येईल, हे मला माहित आहे. मात्र आता गप्प बसणार नाही. सावंतवाडीकरांनी यापूर्वी मला मोठे मतदान केले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी मी मरेपर्यंत त्यांच्यासोबत राहणार; मात्र खोटी आश्वासने देणार्‍या केसरकरांना उघड विरोध करणार. त्यांनी जाहीर केलेल्या विविध प्रकल्पाची पत्रकार व अधिकार्‍यांना घेऊन शोधमोहीम उघडणार, असा इशारा भाजप नेते राजन तेली यांनी गुरुवारी दिला. सावंतवाडी विधानसभा भाजपा मतदार संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, मळगाव प्रभारी सरपचांवर झालेली कारवाई ही योग्य नाही. युतीतला पार्टनर भाजपाच्या विरोधात काम करीत असेेल तर ते योग्य नाही. याची दखल घ्या आणि आगामी काळात दीपक केसरकरांना बाजूला ठेवा, अशी आजही आपली वरिष्ठांकडे मागणी आहे, असे ते म्हणाले.

...तर त्यांचा प्रचारप्रमुख म्हणून काम करेन!

यावेळी त्यांनी केसरकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ते म्हणाले, चष्मा कारखाना, सेटटॉप बॉक्स अशा घोषणा करणार्‍या दीपक केसरकरांनी आता अ‍ॅम्युझमेंट पार्क आणणार, सहाशे एकर जमिनीत हळद लावणार, तीन निवासी शाळा बांधणार, ट्री हाऊस उभारणार, महिला बचतगटांना बस घेऊन देणार अशा नव्या घोषणा सुरू केल्या आहेत. आजपर्यंत त्यांनी ज्या घोषणा केल्या त्यातील एक तरी घोषणा पूर्ण केली काय? किंवा किमान दहाजणांना रोजगार उपलब्ध करून दिला काय? हे दाखवावे. त्यांनी जर हे सिद्ध करून दाखवले तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रचारप्रमुख म्हणून मी स्वतः काम करेन असे आव्हान तेली यांनी दिले.

‘बदल हवा तर आमदार नवा’

गेल्या 15 वर्षांत केसरकर यांना मतदारसंघात काही आणायला जमले नाही. ते आता दोन ते चार आठवड्यात काय आणणार? ते सरळ खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत त्यांना येथील जनतेने निवडून देऊ नये, असे सांगत ‘बदल हवा तर आमदार नवा’ या आवाहनाप्रमाणे कोणालाही आमदार करा, परंतु आता केसरकरांना नको, असे तेली म्हणाले. मळगाव प्रभारी सरपंचांच्या विरोधात अविश्वास आणण्याचा प्रयत्न करणार्‍या केसरकर यांच्या विरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपा शिवसेना महायुुतीतील पार्टनर आपल्या मळगाव येथील सरपंचांच्या विरोधात असे वागत असेल तर युतीचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT