मडुरा : सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे न्हावेली विडी कारखाना ते मातोंड पेंडूरकडे जाणार्या रस्त्यावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. पूल कधीही कोसळू शकतो, अशा धोकादायक स्थितीत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अत्यंत असुरक्षित झाली आहे.
प्रशासनाने पूल निर्धोक करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. न्हावेली विडी कारखाना ते मातोंड पेंडूरकडे जाणार्या रस्त्यावरील या पुलाच्या खराब स्थितीमुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना येथून ये-जा करणे अत्यंत कठीण झाले असून, वाहनचालकांना जीवघेण्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः शाळकरी मुले आणि स्थानिक रहिवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. हा पूल कोसळल्यास न्हावेली आणि मातोंड पेंडूर दरम्यानचा संपर्क तुटण्याची भीती आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.