चोरटयांना पकडण्यासाठी पोलिसांची जिल्हाभर नाकाबंदी (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Police Blockade Operation | चोरटयांना पकडण्यासाठी पोलिसांची जिल्हाभर नाकाबंदी

कणकवली, सावंतवाडी, कुडाळ येथे तपासणी

पुढारी वृत्तसेवा

कणकवलीत जानवली पुलावर नाकाबंदी

कणकवली शहर व तालुक्यात गेला महिनाभरापासून वाढलेल्या चोर्‍यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. गेल्या काही दिवसापासून महामार्गावर नाकाबंदीमध्ये वाढ करत वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. मंगळवारी कणकवलीतील जानवली आणि गडनदी पुलानजिक महामार्गावर पोलिसांनी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली.

जिल्हा पोलिस अधिक्षक मोहन दहीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही नाकाबंदी तपासणी मोहिम राबवली जात आहे. विनापरवाना वाहने चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट वापरणे, अपुरे कागदपत्र, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह, ट्रिपलसिट अशा विविध केसेसची तपासणी करत दंडात्मक कारवाई करण्यात आली. या तपासणी पथकात पोलिस उपनिरीक्षक पवन कांबळी, वाहतूक पोलिस हवालदार दिलीप पाटील, हवालदार दीपक चव्हाण, महिला पोलिस प्रणाली जाधव, कॉन्स्टेबल दिग्विजय काशिद आदी सहभागी झाले होते.

सावंतवाडी शहर हद्दीवर पोलिसांकडून वाहन तपासणी

जिल्ह्यात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिसांनी शहर हद्दीवर ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली. ही नाकाबंदी येथील जिमखाना, कोलगाव तिठा, शिवाजी चौक परिसरात करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

नाकाबंदी दरम्यान, संशयास्पद वाहनांची आणि त्यातील व्यक्तींची कसून तपासणी करण्यात आली. अनेक वाहनधारकांची कागदपत्रे तपासण्यात आली, तसेच त्यांच्या वाहनांच्या डिकीचीही तपासणी करण्यात आली. ही तपासणी अचानक सुरू झाल्याने अनेक वाहनचालकांमध्ये गोंधळ उडाला. तपासणीत नियमभंग करणार्‍या काही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. या तपासणीमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील काळातही अशा प्रकारची नाकाबंदी नियमितपणे सुरू ठेवण्यात येईल, असे संकेत पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिले आहेत

कुडाळमध्ये अचानक तपासणीने वाहन चालकांची तारांबळ

कुडाळ पोलिसांनी सलग दोन दिवस शहर व एमआयडीसी परिसरात नाका बंदी करीत वाहनांची कसून तपासणी केली. या मोहिमेंतर्गत वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर बेधडक कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या अचानक नाकाबंदीमुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली.

जिल्ह्यातील महत्वाचे शहर असलेल्या कुडाळ शहर आणि एमआयडीसी भागात कुडाळ पोलीस प्रशासनाकडून सोमवार आणि मंगळवारी सलग दोन दिवस नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करण्यात आली. कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र भिसे, वाहतूक पोलीस शाम भगत, अमोल बंडगर, ज्योती रायशिरोडकर, पोलीस सुप्रिया कलिंगणी, महेश जळवी, पोलिस नाईक श्री.गायतोंडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश चव्हाण यांच्या टीमकडून कुडाळ येथे वाहनांची तपासणी तसेच चालकाची चौकशी करून नोंद करण्यात आली. तसेच वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT