श्रावण ः मठबुद्रुक-पांडलोस (ता. मालवण) येथील साहिल संतोष बाईत (वय 22) याचे शनिवारी (27 डिसें.) सायं 5 वा. अपघाती निधन झाले. मंगळवारी (दि. 23) साहील कणकवली येथून दुचाकीवरून जात असता पाणलोस-श्रावण मार्गावर परबवाडी येथे त्याची दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. स्थानिकांनी त्याला कणकवली येथे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिक गंभीर बनल्याने त्याला अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथील कर्मचारी संतोष गोपाळ बाईत यांचा तो एकुलता एक मुलगा आहे. साहिल हा श्रावण पंचक्रोशीत उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून परिचीत होता. त्याच्या अकाली निधनाने बाईत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील काका, काकी, भावंडे, आजी, आजोबा असा परिवार आहे.