

ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील पेठ येथील पुणे-बंगळूर महामार्गालगत असलेल्या एका नामांकित कंपनीत रविवारी (दि. 28) सायंकाळी साडेसहा वाजता हृदयद्रावक घटना घडली. कंपनीतील सेप्टिक टँकची साफसफाई करत असताना विषारी वायूमुळे गुदमरून तिघांचा मृत्यू झाला, तर पाचजण गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशाल सुभाष जाधव (26, रा. बेघर वसाहत, ईश्वरपूर), सचिन तानाजी चव्हाण (39, रा. बेघर वसाहत, ईश्वरपूर), सागर रंगराव माळी (33, रा. गोळेवाडी, पेठ) अशी मृतांची नावे आहेत. अन्य बाधित विशाल मारुती चौगुले (24), केशव आनंदा साळुंखे (45), हेमंत शंकर धनवडे (27) आणि सुनील आनंदा पवार (29) यांच्यावर ईश्वरपूर येथे उपचार सुरू आहेत; तर महादेव रामचंद्र कदम (वय 40) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी 6:30 च्या सुमारास कंपनीतील ड्रेनेज आणि सेप्टिक टाकीची साफसफाई सुरू होती. काम करत असताना विशाल जाधव हा अचानक टाकीत पडला. त्याला वाचवण्यासाठी जवळच असलेले सागर माळी आणि सचिन चव्हाण यांनी तातडीने टाकीत उडी घेतली. मात्र, टाकीतील साचलेला विषारी वायू आणि प्राणवायूच्या (ऑक्सिजन) कमतरतेमुळे तिघेही गुदमरले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अन्य पाच कर्मचारीही टाकीत उतरले होते, मात्र विषारी वायूचा प्रभाव वाढल्याने त्यांचीही प्रकृती खालावली. सर्व बाधितांना तातडीने ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पेठ आणि ईश्वरपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशीरापर्यंत घटनेची नोंद ईश्वरपूर पोलिस ठाण्यात नव्हती.