पणदूर : खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दुभाजकावर चढलेला मालवाहू ट्रक (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Highway Accident Due To Potholes | महामार्गावरील खड्डे चुकविताना ट्रक दुभाजकाला धडकला!

पणदूर येथे अपघात; खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. वेताळबांबर्डे पुलानजिक पणदूर येथे महामार्गावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात मालवाहू ट्रकला अपघात झाला. मुंबईहून गोव्याकडे जाणारा हा ट्रक तेथील दुभाजकावर जाऊन आदळला. ही दर्घटना गुरूवारी सकाळी 11 वा. सुमारास घडली. दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील धोकादायक खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महामार्गावर कुडाळ हद्दीत ठिकठिकाणी खड्डे पडले असून महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. दुचाकी खड्ड्यांत आदळून वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. गुरुवारी सकाळी मुंबई ते गोवा जाणारा मालवाहू ट्रक पणदूर येथे आला असता लेनवरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्नात चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट महामार्गाच्या मधोमध दुभाजकाला आदळला व थेट दुभाजकावर चढला. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र ट्रकचे नुकसान झाले. कुडाळ पोलिसात याबाबत कोणतीही नोंद झाली नव्हती.

गणेशोत्सव तोंडावर आला आहे. मुंबईकर चाकरमानी आता गावी येण्यास सुरुवात होणार आहे. परंतू मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. विशेषतः कुडाळ-वेताळबांबर्डे-पणदूर-पिंगुळी परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. वाहनचालक आणि नागरिकांमधून सातत्याने हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी होत आहे. खराब रस्त्यांमुळे प्रवासाला विलंब लागत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे. महामार्ग प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकांमधून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT