Amboli Waterfall  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Amboli Waterfall Tourism | वर्षा पर्यटकांनी बहरली आंबोली

Amboli Waterfall Tourism | घाटमार्गासह सर्व पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी

पुढारी वृत्तसेवा

आंबोली : पुढारी वृत्तसेवा

आंबोली वर्षा पर्यटन हंगामातील दुसऱ्या रविवारी देशभरातील असंख्य पर्यटकांनी आंबोली पूर्णतः बहरून गेली। वीकेंडची सुट्टी असल्याने शनिवार (ता. ११) पासूनच आंबोलीत हजारो पर्यटक दाखल झाले होते. रविवारी आंबोली मुख्य धबधबा, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र, कावळेसाद पॉईंट, महादेव गड पॉईंट, बाबा धबधबा ह्या पर्यटनस्थळांवर हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे घाटमार्गासह ठिक-ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

मागच्या आठवड्यात आंबोली मुख्य धबधबा प्रवाहित झाल्यानंतरच्या वीकेंडचा दुसरा रविवार असल्याने राज्यासह परराज्यांतील पर्यटकांनी आंबोलीत मोठी गर्दी केली। शनिवारपासूनच आंबोली, चौकुळ व गेळे गावांतील सर्वच हॉटेल्स, लॉज आणि होमस्टे हाऊसफुल्ल झाले होते.

त्यामुळे आगाऊ आरक्षण न केलेल्या पर्यटकांची निवास व्यवस्था न झाल्याने मोठी गैरसोय झाली. परिसरात ठिकठिकाणी जागा मिळेल तेथे वाहन उभे करत गाडीतच शनिवारची रात्र काढावी लागली.

रविवार सकाळपासूनच आंबोलीतील सर्व पर्यटनस्थळांवर हजारो पर्यटकांची वर्दळ सुरू झाली होती. यानंतर दुपारच्या सत्रात हजारो पर्यटकांची गर्दी दिसून आली. आंबोली घाटमार्गासह कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र, महादेवगड पॉईंट व बाबा धबधबा येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दिवसभरात सुमारे ६५ हजारांहून अधिक पर्यटकांनी आंबोली वर्षा पर्यटनाचा आनंद लुटला.

प्रशासनाच्या जाचक नियमांचा पर्यटकांना त्रास

आंबोली वर्षा पर्यटनाला प्रशासनाच्या जाचक नियमांचा त्रास सहन करावा लागत होता. खबरदारीच्या नावाखाली आंबोली मुख्य धबधबा, कावळेसाद पॉईंट, महादेव गड पॉईंट, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र व आदी पर्यटनस्थळे ही ४.३० ते ५ वा. बंद करण्यात येतात. पूर्वी ही वेळ सायं. ६ वा.ची होती.

परिणामी वाहतूक कोंडीत अडकलेल्या तसेच दुपारी आंबोलीत दाखल असंख्य पर्यटकांना येथील पर्यटनस्थळांवर भेट देता येत नाही. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत असून ते नाराजी व्यक्त करत आहेत. हे जर असेच चालू राहिल्यास आंबोली पर्यटनावर गंभीर परिणाम होणार आहेत. तसेच स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT