सावंतवाडीः सुभेदार मेजर संजय सावंत यांचा सत्कार करताना बबन साळगावकर. सोबत उमाकांत वारंग, सीताराम गावडे ,विलास जाधव आदी. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Operation Sindoor Konkan Hero| माता-भगिनींच्या कपाळावरील कुंकू पुसणार्‍यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ चोख प्रत्युत्तर!

Subedar Major Sanjay Sawant | कारिवड्याचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांचा भव्य सत्कार

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : कोकणवासियांनी केलेला हा सत्कार केवळ माझा नसून, वर्दी घातलेल्या प्रत्येक सैनिकाचा आहे. देश असेल तरच मी आहे आणि हा सन्मान माझ्या देशासाठी आहे. देशासाठी लढणे, देशासाठी मरणे आणि सन्मानाने जगणे हेच माझे ध्येय आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेचे मुख्य कारण हवाई सुरक्षा दल होते. आमच्या माता-भगिनींच्या कपाळावरील कुंकू पुसणार्‍यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ हे चोख प्रत्युत्तर होते, असे उद्गार सुभेदार मेजर संजय सावंत यांनी काढले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून गुरुकुल येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावचे सुपुत्र असलेले सुभेदार मेजर संजय सावंत यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये प्रशंसनीय कामगिरी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही त्यांचे कौतुक केले होते. पाकिस्तानविरुद्धच्या या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्य दलाच्या हवाई सुरक्षा विभागात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने पाकिस्तानचे 45 ड्रोन आणि 2 क्षेपणास्त्रांचे हल्ले आकाशातच उध्वस्त करून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संरक्षण मंत्र्यांनी सुभेदार मेजर आणि त्यांच्या टीमला शाबासकी दिली होती. गुरूवारी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या प्रयत्नातून आणि गुरुकुलच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी देशासाठी लढलेल्या या वीर भूमिपुत्राचा अभिमान असल्याचे मत व्यक्त केले.

बबन साळगावकर म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी सुभेदार मेजर यांना बोलावणे आले, तेव्हा ते सावंतवाडीत होते. सैन्याचे बोलावणे येताच ते त्वरित निघाले. त्यांनी देशाला अभिमान वाटेल असे कार्य केले आहे. सत्कार समारंभाला माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे, मनोज घाटकर, दीपक सावंत, रवी राऊळ, रत्नाकर माळी, उमेश खटावकर, दत्तू नार्वेकर, बंड्या तोरसकर, लवू पार्सेकर, मंगेश गोसावी, अजित सावंत, सत्यवान साईल आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना सुभेदार मेजर सावंत म्हणाले, यापूर्वीही माझे अनेक सत्कार झाले आहेत, परंतु माझ्या जन्मभूमीत झालेला हा सन्मान माझ्यासाठी खास आहे. मी आरपीडीत शिकलो. माझे वडील आणि भाऊ सैनिक आहेत. ही शौर्याची भूमी आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी जन्म घेतला. सावंतवाडीच्या राजघराण्याचाही सैन्यदलात मोठा इतिहास आहे. त्यांनी देशाला अनेक सैनिक दिले. त्यामुळे आजच्या पिढीने त्यांचा आदर्श घेऊन आपले काम निष्ठेने केल्यास देशाचे कल्याण होईल.

शत्रूचा ड्रोन केवळ 10 मीटरवर पडला

‘ऑपरेशन सिंदूर’ वेळी शत्रूचा ड्रोन केवळ दहा मीटर अंतरावर पडला होता, मात्र देवाच्या आशीर्वादाने आपण बचावल्याचे त्यांनी सांगितले. सीज फायरपूर्वी आणखी चार तास मिळाले असते, तर पाकिस्तानला आणखी नेस्तनाबूत करता आले असते, असे त्यांनी सांगितले. मी सावंतवाडीचा सुपुत्र असल्याचा मला अभिमान आहे आणि माझी नाळ इथल्या लोकांशी जोडलेली आहे. राष्ट्र प्रथम मानणारा मी एक सैनिक आहे, असे सुभेदार मेजर संजय सावंत यांनी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT