रेल्वेतून पडून एकाचा दुर्देवी मृत्‍यू file photo
सिंधुदुर्ग

रेल्वेतून पडून एकाचा दुर्देवी मृत्‍यू, ठाणे स्टेशनवर अपघात

काकांच्या दिवसकार्याला जाताना ठाणे रेल्वेस्टेशनवर गर्दीत रेल्वेतून पडल्याने झाला मृत्‍यू

पुढारी वृत्तसेवा

One person dies tragically after falling from a train

देवगड : पुढारी वृत्तसेवा

काकांच्या दिवसकार्याला जात असताना देवगड तालुक्यातील मूळ रामेश्वर कोलवाडी येथील तेजस उदय पवार (३०, सध्या रा. दिवा मुंबई) याचा गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई- ठाणे रेल्वेस्टेशन येथील अपघातात मृत्यू झाला. रामेश्वर येथील जि. प. च्या माजी सदस्या वर्षा पवार यांचा तो मुलगा आहे. तेजसच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच रामेश्वरसह गिर्ये, विजयदुर्ग परिसरात शोककळा पसरली.

या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तेजस हा मुंबई येथे खासगी कंपनीत कामाला होता. दीड वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. तो सध्या दिवा मुंबई येथे पत्नीसमवेत स्वमालकीच्या घरात वास्तव्यास होता. दरम्यान, नालासोपारा येथे वास्तव्यास असणाऱ्या त्याच्या काकांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या दिवसकार्याला जाण्यासाठी तेजस हा पत्नीसमवेत गुरुवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचला.

पत्नीला रेल्वेत महिलांच्या राखीव डब्यात सुरक्षितरित्या बसवून तो अन्य डब्यात बसण्यासाठी गेला. स्टेशनवरून रेल्वे मार्गस्थ होत असतानाच डब्यात अचानक गर्दी वाढली. या गर्दीचा झटका बसून तो रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकला गेला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. तेथील ग्रामस्थांनी त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

त्‍याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, वहिणी असा परिवार आहे. तेजस हा मनमिळावू स्वभावाचा होता. त्याचा मित्र परिवारही मोठा होता. देवगड तालुका नाभिक संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सल्लागार उदय पवार यांचा तो मुलगा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT