

वेंगुर्ले/मळगाव : वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर-मडकीलवाडी येथे मुलाने घराच्या छपरावर चढून हातातील बंदुकीने अंगणात बसलेल्या आईवर गोळी झाडली. यात आई वासंती वासुदेव सरमळकर (वय 65) हिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार 14 जानेवारी रोजी रात्री 8.30 वा.च्या सुमारास घडली. या घटनेने अणसूर गावासाह वेंगुर्ला तालुक्यात खळबळ उडाली आहे. उमेश वासुदेव सरमळकर (40) असे संशयित मुलाचे नाव आहे. कर्जाच्या वादातून त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत दाखल फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केल्यावर वेंगुर्ला पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली आहे.
या घटनेची फिर्याद जागृती जयेश सरमळकर (मूळ रा. अणसूर मडकीलवाडी, सध्या रा. विनायक रेसिडेन्सी, कॅम्प वेंगुर्ला) यांनी वेंगुर्ले पोलिसांत दिली. उमेश सरमळकर हा वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर पाल-मडकीलवाडी येथील घरी पत्नी व दोन मुलांसह वडिलोपार्जित घरात वरच्या मजल्यावर राहतो. त्याने अनेक बँकांकडून कर्जे घेतली होती. मात्र ती वेळेत न भरल्याने संबंधित बँकांकडून वसुलीसाठी तगादा सुरू होता. यावरून उमेश व त्याची आई वासंती सरमळकर यांच्यात वारंवार वाद होत असत. दरम्यान, वासंती या सध्या जयेश सरमळकर या पोलिस सेवेत असलेल्या मुलासोबत वेंगुर्लेत राहत असत.
मकर संक्रांती निमित्त बुधवारी त्या सून सौ. जागृती व त्यांच्ा मुलासोबत अणसूर येथील घरी आल्या होत्या. तर पोलिस सेवेत असलेले जयेश हे कर्त्यव्यावर असल्याने वेंगुर्ले येथे होते. सायं. 4 वा. च्या सुमारास त्या घराच्या अंगणात खुर्चीवर बसलेल्या असताना उमेश याने घराच्या छप्परावर चढत बंदुकीतून आई वासंती यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. गोळी थेट छातीत घुसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश सरमळकर याने विविध बँका व बचत गटांकडून कर्ज घेतली होती. त्या कर्जाच्या परतफेडी वेळेवर न झाल्यामुळे बँका वारंवार घरी येऊन कर्ज वसुलीसाठी तगादा लावत होते. या कर्जाच्या कारणावरून मयत आई वासंती सरमळकर व आरोपी मुलागा उमेश सरमळकर यांच्यात वारंवार वाद व भांडणे होत होती. या रागातून त्याने आईवर गोळी झाडली. ही गोळी मयत यांच्या डाव्या बाजूच्या छातीला लागल्याने त्या जागीच गंभीर जखमी झाल्या व त्यांचा मृत्यू झाला. उमेश सरमळकर याला राहत्या घरातून अटक केली. मयत वासंती सरमळकर यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे व एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.