ओंकार टस्कर सैरभैर; ग्रामस्थांमध्ये भीती  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Aggressive Elephant | ओंकार टस्कर सैरभैर; ग्रामस्थांमध्ये भीती

मोर्ले येथे एका वृद्धाचा बळी घेतल्यानंतर ‘ओंकार’ नावाचा टस्कर अत्यंत सैरभैर, बेचैन व आक्रमक झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : मोर्ले येथे एका वृद्धाचा बळी घेतल्यानंतर ‘ओंकार’ नावाचा टस्कर अत्यंत सैरभैर, बेचैन व आक्रमक झाला आहे. तो सध्या मोर्ले आणि घोटगेवाडी या दोन गावांमध्ये एकटाच दिवसरात्र मुक्तपणे संचार करत आहे. या टस्कराच्या दहशतीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांमध्ये यामुळे तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून, कोणतंही जीवितहानीचं संकट उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान ग्रामस्थांनी वनविभागाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हत्तीच्या पकडीसाठी तात्काळ मोहीम राबविण्याची जोरदार मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मोर्ले गावाचे माजी सरपंच गोपाळ गवस यांनी जर या सैरभैर हत्तीमुळे पुन्हा एखाद्याचा बळी गेला, तर त्यास वनविभाग आणि राज्य शासन जबाबदार राहील असा इशारा दिला आहे.

8 एप्रिल 2025 रोजी लक्ष्मण गवस या शेतकर्‍याचा बळी ओंकार टस्कराने घेतल्यानंतर शासनाने या हत्तीच्या पकडीचा निर्णय घेतला होता. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव यांनी या 30 जून 2025 पर्यंत या टस्कराला पकडण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष आहे. हत्तीमुळे वारंवार शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. पिकांचे होणारे नुकसान, रात्रीच्या वेळेस हत्ती भर वस्तीत येणे यामुळे ग्रामस्थ व शेतकरी रात्री घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत.

ग्रामस्थांच्या काळजात धडकी गावकर्‍यांचा प्रश्न आहे की, ज्या हत्तीमुळे आधीच एक बळी गेला आहे, त्याच्या विरोधात आधीच आदेश निघाले असताना त्याची अंमलबजावणी का झाली नाही? ही कुचराई भविष्यात आणखी एखाद्या दुर्दैवी घटनेचे कारण ठरू शकते. त्यामुळे हत्तीच्या पकडीसाठी तात्काळ आणि प्रभावी पावले उचलावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

वनविभाग म्हणते टस्कर नियंत्रणात

याबाबत सहाय्यक उपवनसंरक्षक वैभव बोराटे यांच्याशी संपर्क साधला असता ओंकार हत्ती सातत्याने आपले ठिकाण बदलत आहे. त्यामुळे त्याला पकडणे आव्हानात्मक ठरत आहे. मात्र, तो आमच्या नियंत्रणाबाहेर नाही. ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी घाबरण्याचे कारण नाही. आमचे कर्मचारी सातत्याने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT