दोडामार्ग : गोव्यातून महाराष्ट्रात दाखल ‘ओंकार’ हत्तीने दोडामार्ग तालुक्यातील कळणे, भिकेकोनाळ, कोलझर, शिरवल परिसरात नुकसान करत केर -निडलवाडीपर्यंत मजल मारली होती. मात्र, अचानक माघारी फिरत तो पुन्हा भिकेकोनाळमध्ये दाखल झाला आहे. हत्तीची ही अनिश्चित हालचाल सावंतवाडीच्या दिशेने होणार की गोव्याकडे, याबाबत संभ्रम कायम असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
‘ओंकार’ हत्तीची पावले पुन्हा माघारी वळल्याने दोडामार्ग तालुक्यातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे तीन दिवसांपूर्वी ‘ओंकार’ हत्तीने दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावात प्रवेश केला होता. येथे दावणीला बांधलेल्या एका बैलाचा बळी घेतल्यानंतर हत्तीने भिकेकोनाळ, कोलझर, शिरवल या गावांच्या परिसरात शेती बागायतींचे नुकसान केले. त्यानंतर तो केर निडलवाडीच्या दिशेने सरकला होता.
मात्र, केर -निडलवाडीतून हत्तीने अचानक माघारी फिरत पुन्हा भिकेकोनाळ गावात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता हा हत्ती सावंतवाडी तालुक्याच्या दिशेने पुढे सरकणार की पुन्हा गोव्याच्या दिशेने जाणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. हत्तीच्या या सतत बदलणार्या हालचालींमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे.
कळणे सरपंच वन विभागावर नाराज
कळणे गावचे सरपंच यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘ओंकार’ हत्ती तसेच इतर हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचे कर्मचारी व हत्ती हाकारी लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात हत्तींकडून होणारे नुकसान थांबताना दिसत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
वनविभाग व हाकार्यांनी हत्तीला तिलारीच्या दिशेने हाकलल्याचे सांगण्यात आले होते;मग तो पुन्हा माघारी कसा आला? असा सवाल सरपंच देसाई यांनी विचारला आहे. ओंकारच्या हालचालींमुळे मानवी वस्तीला धोका निर्माण झाला असून संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी वनविभागाने अधिक प्रभावी व ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सरपंच देसाई व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.