

कणकवली/ नांदगाव : कणकवलीतील डॉ. नागवेकर हॉस्पिटलची रविवारी दुपारी संतप्त जमावाकडून तोडफोड करण्यात आली. कासार्डेतील युवतीचा मृत्यू झाल्याने नागरिकांचा उद्रेक होत हॉस्पिटलच्या दारातच मृतदेह आणून ठेवला. मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र होत हॉस्पिटलमध्ये घुसले. डॉक्टर, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताना मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. धक्काबुक्की ही झाली. संतप्त जमावाकडून गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. वाढता उद्रेक लक्षात घेऊन पोलिसांचा मोठा फौजफाटा हॉस्पिटलजवळ पोहोचला. जमावाला काबू करत पोलिसांनी तब्बल चार तास सुरू असलेले आंदोलन नियंत्रणात आणले.
कासार्डे-तर्फेवाडी येथील व रत्नागिरी-डेरवण येथे नर्सिंगचे शिक्षण घेणारी कस्तुरी चंद्रकांत पाताडे हिच्या डोक्याला पाठीमागे काही तरी गाठ असल्याचे लक्षात आल्याने याची माहिती घरच्यांना दिली. ती डेरवणवरून गावी कासार्डे येथे आल्यानंतर तिला शुक्रवार 12 डिसेंबर रोजी कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणण्यात आले. रूग्णालयात तिची तपासणी केल्यानंतर तिला शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. वडिलांनी शस्त्रक्रियेला होकार देत तिची शस्त्रक्रिया शुक्रवारी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. मात्र रात्री तिची प्रकृती काहीशी गंभीर झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
रात्री प्रकृती आणखीन खालावली होती. दुसऱ्या दिवशी 13 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा.च्या सुमारास तिला अधिक उपचारासाठी गोवा अथवा कोल्हापूर येथे घेऊन जा असे सांगितले. यानंतर डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना बोलून घेत तिला अधिक उपचाराची गरज असल्याचे सांगितले व उपचारास कोल्हापूर पुणे मुंबई येथे नेण्यास सांगितले. मात्र यावर हतबल झालेल्या आई-वडिलांनी आपल्यापासून जवळ असलेल्या कोल्हापूरला नेण्याचे ठरवले. हे ठरवल्यानंतर डॉक्टरांनी कोणताही खर्च न घेता रुग्णवाहिका देत तिला कोल्हापूरला दाखल करण्यात आले. कोल्हापूर येथे दाखल केल्यावर घातल्यावर तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर तिची वाचण्याची कमीच शक्यता असल्याचे सांगितले. यावर कुटुंबीयांनी उपचार करण्यास सांगितले उपचार सुरू असताना रविवारी सकाळी 6 वा. च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. याची माहिती वडील चंद्रकांत यांनी आपल्या कासार्डेतील व वाडीतील मंडळींना सांगितले व तिचा मृतदेह कोल्हापूर वरून घरी घेऊन येत असल्याचे सांगितले. ही बातमी कासार्डे गावात सर्वत्र पसरल्यावर संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचबरोबर नागरीकांमधून संतापही येत होता.
कस्तुरी हिचा उचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर माजी जि. प. सदस्य संजय देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक एकत्र आले. हा मृत्यू डॉक्टरच्या हलगर्जीमुळे झाला आहे. तिच्यावर योग्य उपचार न झाल्यामुळे आज कस्तुरीचा जीव गेला आहे. तरी आपण डॉक्टरला जाब विचारयाला जायचे असे ठरल्यानंतर कासार्डे तिठ्ठा येथे एकत्र होत सर्वानी कणकवली रूग्णालयात जाण्याचे ठरविले. याचदरम्यान कोल्हापूरवरून कस्तुरीचा मृतदेह कासार्डे येथे आला असता दुसऱ्या रुग्णवाहिकेतून तो कणकवलीतील त्या खाजगी रुग्णालयात आणण्यात आला. मृतदेह स्ट्रेचरवरून घेऊन डॉ.नागवेकर हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरच ठेवण्यात आला. यावेळी कासार्डेतील महिला व पुरुषांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होत रुग्णालयात घुसून आक्रोश करण्यास सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांनी डॉक्टरांना बाहेर घेऊन या. मुलीचा मृत्यू त्यांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे अशी ओरड केली. उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून समजूत घालण्यास सुरु असतानाच जमावाचा संताप वाढतच गेला. यावेळी कर्मचारी व ग्रामस्थांमध्ये धक्काबुक्की झाली. मुलीचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे, असा आरोप करत मृत्यूची जबाबदारी घ्या व डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळायला हवी अशी मागणी ग्रामस्थ व नातेवाईकांनी केली.
रुग्णालयात वादावादी सुरु असतानाच बाहेरील संतप्त जमावाने आत घुसण्यचा प्रयत्न करत रुग्णालयाच्या काचा फोडल्या. हॉस्पिटलबाहेर एकच आरडाओरडा सुरु होता. जमावाने आत घुसत तोडफोड केली तसेच परिसरातील असलेल्या गाड्यांच्या काचाही फोडल्या.
हॉस्पिटलमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर कणकवली पोलिसांनी धाव घेतली. जमावाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या संख्येने नागरिक चाल करुन येत असल्याने अखेर पोलिस कुमक वाढविण्यात आली. जिल्ह्याभरातून पोलिस कणकवलीत दाखल झाले. हॉस्पिटल परिसरात पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. कायदा हातात घेऊ नका असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर काहीसा जमावाचा उद्रेक कमी झाला. स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते हॉस्पिटलजवळ धाव घेतली होती. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला असता आम्ही गुन्हेगार आहोत का? असा सवाल नागरीकांमधून विचारण्यात आला. हॉस्पिटल पाठीमागे असलेल्या डॉ. नागवेकर यांच्या घराकडेही जमावाने मोर्चा वळवला असता पोलिसांनी तातडीने हालचाल करत जमावाला रोखले.
पोलिसांचा मोठा फौजफाटा
कणकवलीतील नागरिकांच्या उद्रेकाची माहिती मिळाल्यानंतर अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक नयोमी साटम यांच्यासह सावंतवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी व्ही.जी.कांबळे, कणकवलीचे पोलिस निरिक्षक तेजस नलावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश सावंत, गजानन पडळकर यांच्यासह जिल्हयातील पोलिस अधिकारी उपस्थित होते. कणकवलीसह, कुडाळ, देवगड, वैभववाडी, विजयदुर्ग, आचरे येथून पोलिस कुमक कणकवली येथे दाखल झाली होती. हॉस्पिटल परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. संतप्त जमावाला आटोक्यात आणल्यानंतर व सर्व नागरीकांना परिसरातून बाहेर काढत पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
चर्चेतून तोडगा
माजी जि.प.सदस्य संजय देसाई, बाळा जठार, संदेश पारकर, संतोष कानडे, प्रकाश पारकर, मिलिंद मेस्त्री, संतोष पारकर, दिलीप तळेकर, सरपंच निशा नकाशे, गणेश पाताडे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी संतप्त नागरिकांची समजूत काढली. याची माहिती पालकमंत्री नितेश राणे देण्यात आली. त्यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर हॉस्पिटलच्या डॉक्टरांसोबतही चर्चा करण्यात आली. चर्चेतून मार्ग काढल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाबाहेरही पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर कस्तुरीचा मृतदेह रात्री नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
कासार्डेत शोककळा
कस्तुरीचे वडील चंद्रकांत हे कासार्डे पेट्रोलपंप येथे बॅटरीचा व्यवसाय करतात. कस्तुरीला नर्सिंगचे शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर तिला उभे करण्याचे स्वप्न होते. कुटुंबालाही तिचा आधार होणार होता. आपल्या मुलीवर अशी वेळी येईल असे स्वप्नातही त्यांनी पाहिले नव्हते. तिच्या पश्चात वडील, आई, भाऊ असा परिवार असून तिच्या अकाली जाण्याने कासार्डेसह परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांत गुन्हा
कणकवलीत हॉस्पिटलची तोडफोड झाल्यानंतर कस्तुरीचे वडील व नातेवाईक यांनी सायंकाळी कणकवली पोलिस स्टेशनवर जावून अप्पर पोलिस अधिक्षक नयोमी साटम यांची भेट घेतली. कस्तुरीच्या मृत्यू संदर्भातील तक्रार अर्ज त्यांनी पोलिसांना सादर केला. याविषयी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.