सावंतवाडी : गोवा व महाराष्ट्र आंतरराज्य सीमा परिसरात धुमाकूळ घालणारा टस्कर हत्ती ‘ओंकार’सह दोडामार्ग तालुक्यात स्थिरावलेल्या सर्व हत्तींना पकडून ‘वनतारा’ येथे पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आ. दीपक केसरकर यांनी दिली. यासाठी वनमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला असून पुढील आठवड्यात मंत्रालयात होणार्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती आ. केसरकर यांनी दिली.
सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधताना आ. केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात स्थिरावलेल्या हत्तींमुळे गेल्या अनेक वर्षांपासून जीवित आणि वित्तहानी होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ‘ओंकार’ सह इतर हत्तींना पकडून ‘वनतारा’मध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहीमेला वनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक होणार आहे. या बैठकीस वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहाणार असून, या बैठकीत वरील निर्णयाला अंतिम मान्यता देण्यात येईल, अशी माहिती आ. केसरकर यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने ‘वनतारा’मधील प्राणी सुरक्षित असल्याचा निकाल दिल्याने, हत्तींना तिथे पाठवल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेतली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्तकेला.
शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी शिंदे सेना लवकरच भाजपमध्ये विलीन होणार असल्याची टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना आ. केसरकर म्हणाले, कोण काय बोलतो याला महत्त्व नाही. खरी शिवसेना आमची आहे. पक्षाचे चिन्ह आणि निवडून आलेले आमदार-खासदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे जनतेला खरी शिवसेना कोणती, हे माहीत आहे. यामुळे खा. राऊत यांच्या बोलण्याला महत्त्व देणे योग्य वाटत नाही, असे ते म्हणाले.