पालकमंत्री नितेश राणे  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Sindhudurg news: कसलाही अणुऊर्जा प्रकल्प जिल्ह्यात होणार नाही! ना. नितेश राणे : राजकारणासाठी सिंधुदुर्गची प्रतिमा खराब न करण्याचे आवाहन

पर्यावरणाला हानीकारक प्रकल्प येणार नाही हीच आमची भूमिका आहे; असेही ते म्हणाले

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : कसलाही अणुऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील ते स्पष्ट केले असून, पर्यावरणाला हानी होईल असा एकही उद्योग, व्यवसाय सिंधुदुर्गात येणार नाही. रोजगारासाठी तरुण सिंधुदुर्गच्या बाहेर गेले असून, त्यांना परत आणणे देखील आवश्यक आहे. मात्र, आंदोलनामुळे सिंधुदुर्गची प्रतिमा खराब होऊ नये, गुंतवणूकदारांनी इथे येताना सकारात्मकताही दाखवली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाला हानीकारक प्रकल्प येणार नाही हीच आमची भूमिका आहे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ज्याप्रमाणे मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा दारू, ड्रग, मटका, जुगार, बीफ व्यापार पूर्णपणे नष्ट करण्याचा आमचा निर्धार आहे. केवळ किरकोळ विक्री करणाऱ्यांवरच नाही, तर मुख्य सूत्रधारांवर कारवाई केली जात आहे. गुन्हेगार हा गुन्हेगार असून त्यांचा पक्ष, झेंडा, जात, धर्म न बघत कठोरातली कठोर कारवाई केली जाईल. अवैध धंदे मुक्त सिंधुदुर्ग करेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. कुठल्याही टोकाला जाण्याची माझी तयारी असून मागे हटणार नाही, असा सज्जड दम पालकमंत्री राणेंनी दिला.

सावंतवाडी येथे रविवारी आयोजित नगराध्यक्ष चषक स्पर्धेवेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगराध्यक्ष श्रद्धाभोसले भोसले, युवराज लखमराजे भोसले, विक्रांत सावंत, सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका मोहिनी मडगावकर, नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते. अणुऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्गात होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही केवळ राणे द्वेषापायी होणारा विरोध, ही भूमिका तरुणांचे भविष्य अंधारात टाकणारी आहे, अशी टीका त्यांनी केली.

सावंतवाडी न. प. मध्ये लवकरच पूर्णवेळ मुख्याधिकारी

सावंतवाडी न. प. ला पूर्णवेळ मुख्याधिकारी लवकरच मिळेल. सिंधुदुर्ग जिल्हा ५५ टक्के शासकीय क्षमतेवर काम करत आहे. बरीच रिक्त पदे असून ही पद भरण्यासाठी सरकार सज्ज आहे. येणाऱ्या काळात ही रिक्त पदे दिसणार नाहीत, अशी ग्वाही ना. राणे यांनी दिली.

ठेकेदारांना ब्लॉक लिस्टमध्ये टाकू

सावंतवाडी नळपाणी योजनेचे काम वेळेत काम पूर्ण करण्यासह दर्जेदार करण्याच्या सूचना मी दिल्या होत्या. दर्जात कसूर दिसली तर कोणालाही सोडणार नाही. ठेकेदारांना ब्लॉक लिस्टमध्ये टाकण्यात येईल. यासंदर्भात मंत्रालयात मी बैठक बोलावली असून संबंधित ठेकेदारासमक्ष मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी मिळून या कामाचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, अशीही माहिती त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT