

देवगड : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी व देवगडातील प्रस्तावित अणुउर्जा प्रकल्पाविरोधात आंबा काजू बागायतदार व व्यापारी महासंघाने शुक्रवारी मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी जाहीर मेळावा व जलसमाधी आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मिठमुंबरी समुद्रकिनाऱ्यावर आंदोलन करताना रोखण्यासाठी भव्य मानवी कडे तयार केले होते. मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त ठेवून समुद्राच्या पाण्यात आंदोलनकर्ते उतरू नये अशा पध्दतीने तयार केलेले मानवी कडे तोडून १० ते १२ आंदोलनकर्ते समुद्राच्या पाण्यात उतरले व त्यांनी पालकमंत्र्यांविरोधात व शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
बागायतदारांच्या एकजुटीचा विजय असो अशा घोषणा त्यांनी यावेळी दिल्या.आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत, रासप नेते महादेव जानकर, माजी आ.वैभव नाईक या प्रमुख नेत्यांना मात्र पोलिसांनी पाण्यात उतरण्यास अटकाव केला. आंदोलनकर्त्यांसमोर येवून जिल्हाधिकारी यांनी भावना जाणून घेतल्या नाहीत याबद्दल त्यांचा आंदोलनकर्त्यांनी निषेध केला.यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर आणि पोलिस अधिक्षक मोहन दहिकर यांनी आंदोलनकर्त्यांचे जलसमाधी आंदोलन करू नये असे आवाहन केले.
यावेळी राजू शेट्टी यांनी या अधिवेशनात शासनाने अणुउर्जा प्रकल्पाचा एमओयु रद्द करावा, न्याय्य मागण्या मंजुर कराव्यात अन्यथा यापुढेही विविध मार्गाने व गनिमी काव्याने आंदोलने करू असा इशारा दिला.याची दखल शासनाला घ्यावीच लागेल असे सांगीतले तर मागण्या व भावना शासनापर्यंत पोहचवू असे आश्वासन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिले.मेळावा व जलसमाधी आंदोलनासाठी मिठमुंबरी समुद्रकिनाऱ्यावर ५०० हून अधिक बागायतदार, शेतकरी, नागरिक उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सौ.साक्षी वंजारे, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिंदे गटाचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर, फळबागायती संघटना अध्यक्ष आप्पा अनभवणे, अणुउर्जा अभ्यासक मंगेश सावंत, संघटनेचे अध्यक्ष काका ढोके, गणेश गावकर, किरण टेंबुलकर, दिनेश धुवाळी आदी उपस्थित होते.
मेळाव्यासमोर संबोधताना राजु शेट्टी म्हणाले, आंबा काजू बागायतदार संघटना गेले चार महिने विविध मार्गाने आंदोलने करून आंबा बागायतदारांना शासनाने हेक्टरी पाच लाख रूपये तर काजू बागायतदारांना हेक्टरी तीन लाख रूपये भरपाईपोटी मदत द्यावी अशी मागणी करीत आहे मात्र शासनाने बागायतदारांना हेक्टरी २२ हजार ५०० अशी तुटपुंजी मदत जाहीर केली तर काजू बागायतदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून बागायतदारांची थट्टा केली. बागायतदारांच्या न्याय्य मागण्यांसाठी हे आंदोलन असून शासनाला ठेकेदारांना पोसण्यासाठी तिजोरी खाली करता येते मात्र बागायतदारांना मजुरांच्या मजुरीपेक्षाही कमी भरपाई जाहीर करून त्यांची चेष्टा करीत आहेत. अणुउर्जासारखे विनाशकारी प्रकल्प कोकणात आणून येथील नैसर्गिक साधनसंपत्ती संपविण्याचे काम सरकार करू पाहत आहे.येथील नेते कोकणचा कॅलिफोर्निया करू असे एकीकडे सांगत आहेत तर असे विनाशकारी प्रकल्प आणून कोकणचे वाळवंट करण्याचे काम हे सरकार करीत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.
बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळाव्यासाठी शासनाने ३५ हजार कोटीची तरतुद केली आहे.कमिशन घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. आपल्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी सरकारविरोधी आंदोलन करणाèयांविरोधात तडीपारी, गुन्हे दाखल करणे अशा कारवाई करू नयेत असे उच्च न्यायालयाने सरकारला ठणकावून सांगीतले आहे.सध्याची शासनव्यवस्था ही अदानी, अंबानीसाठी चालविलेली व्यवस्था असून एक दिवस आम्हीच तुम्हाला तडीपार करू असा इशारा शेट्टी यांनी दिला.
दलांलावर बहिष्कार टाका
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पापासून आपला विनाशकारी प्रकल्पविरोधी लढा सुरूच असून देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्या सांगण्यावरून देवगडमध्ये अणुउर्जा प्रकल्प आणण्याचा घाट घातला आहे.हे प्रकल्प आधी येत नाहीत तर जमीनी खरेदी करणारे दलाल प्रथम येतात या दलालांवर प्रथम बहिष्कार टाका.आंबा बागायतदार व काजू बागायतदार यांना त्यांचा मागणीनुसार भरपाई दिली नाही मात्र हा राजा उदार झाला आणि अणुउर्जासारखा करोडो रूपयांचा घातक प्रकल्प येथिल जनतेच्या माथी मारत आहे. - शिवसेना सचिव विनायक राऊत
ताकद असेल तर प्रकल्प रद्द करा
राणे यांचा धसका घेवू नका. शासन बदलवून टाकणारी आम्ही माणसे आहोत. हे अदानी,अंबानी यांना विकले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा लबाड मुख्यमंत्री बघितला नाही. कसली राणे स्टाईल सत्तेमध्ये आहात तुमच्यात खरी ताकद असेल तर प्रकल्प रद्द करा असे आव्हान महादेव जानकर यांनी राणें यांना केले. अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधासाठी प. महाराष्ट्र, विदर्भ तुमच्या पाठीशी राहील.खंबीरपणे उभे राहू,प्रकल्पविरोधासाठी गावात चळवळ उभी करा असे आवाहन त्यांनी केले. - रासप नेते महादेव जानकर
लढाई सुरू झाली आहे
राणे लोकांचा विश्वास गमावित चालले आहेत.एकीकडे बागायतदारांना तुटपुंजी मदत जाहीर केली आणि याचे श्रेय यांचे आमदार भाऊ घेत आहेत.तिन्हीही राणे जिल्ह्यात सत्तेत आहेत.त्यामुळे प्रकल्प होणार हा समज आपल्याला खोडून काढायचा आहे.लढाई सुरू झाली आहे.शिवसेनेची ताकद तुमच्या पाठीशी आहे.
-वैभव नाईक माजी आमदार
अणुउर्जा प्रकल्पाची एमओयू अदानी अंबानी यांनी केली आहे.प्रकल्पाचा अनुषंगाने सव्र्हे सुरू होता मात्र प्रशासनाला माहित नाही हे आश्चर्य आहे.अशा घातक प्रकल्पांनी येथील शेतकèयांना भुमिहीन होवू देणान नाही.प्रसंगी प्रकल्प विरोधासाठी देवगडमध्ये पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही आणून हा प्रकल्प कायमचा हद्दपार करू असे मत सुशांत नाईक यांनी व्यक्त केले.