पालकमंत्री नितेश राणे pudhari photo
सिंधुदुर्ग

Nitesh Rane : 16 तारखेनंतर नितेश राणे करणार धमाका!

आ. नीलेश राणे यांच्या राजकीय भूमिकेवर आक्षेप; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही घेतली भेट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कणकवलीत नगरपंचायत निवडणुकीत भाजपला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर मत्स्य व्यवसायमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन पराभवाच्या कारणांची माहिती सादर केली आहे. त्यानंतर एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी आमदार नीलेश राणे यांच्या निवडणुकीतील राजकीय भूमिकेवर आक्षेप घेतला असून, 16 तारखेला महापालिका निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर संपूर्ण माहिती विस्तृतपणे आपण जाहीर करणार आहोत. भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून पक्षाला लागलेले डाग पुसून टाकण्याचे काम करणार आहोत, असे जाहीर केले आहे. त्यामुळे 16 तारखेनंतर मंत्री नितेश राणे काय धमाका करणार, याकडे कोकणचे लक्ष लागून राहिले आहे.

मंत्री नितेश राणे यांनी एक्सपोस्ट करत आजवर गप्प होतो, आता बोलण्याची वेळ आली आहे, असे जाहीर केले होते. त्यांच्या या पोस्टनंतर त्यांनी वृत्त वाहिनीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, भाजपचे जिल्ह्यात दोन नगराध्यक्ष आणि 41 नगरसेवक निवडून आले असून या निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष राहिला आहे. कणकवलीच्या निकालाबाबत आम्ही विश्लेषण करतो आहोत. आतील, बाहेरील, घरचे, बाहेरचे असे विविध फॅक्टर त्यात होते. कणकवली हा खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला आहे. परंतु, त्यांच्याच कुटुंबाची मदत घेऊन त्यांचा खंदा कार्यकर्ता समीर नलावडे यांना अपप्रचार करून पाडण्यात आले.

महायुती का झाली नाही, याचा विचार आमदार निलेश राणे यांनी करायला हवा. त्याची उत्तरे त्यांच्याकडेच आहेत. निलेश राणे यांना आमदार करण्यामध्ये शिवसेनेप्रमाणे भाजपचाही मोठा वाटा होता. मात्र गेल्या अकरा महिन्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना शिव्या देणे, धमक्या देणे असे प्रकार घडले. रणजित देसाई प्रकरण मध्यंतरी बाहेर आलंच होतं. पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे अपमानीत झालेला भाजपचा कार्यकर्ता युती करायला तयार नव्हता. कार्यकर्त्यांमध्ये इतका मोठा रोष आहे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी युती केल्यानंतर रागापोटी विरोधी पक्षाला मतदान केले तर नुकसान होईल म्हणून स्वबळाचा निर्णय भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनाही सांभाळण्याची जबाबदारी आमदार निलेश राणे यांची होती. परंतु त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी आपला झालेला अपमान सांगत होते. परंतु निवडणूक काळात मी हे बोलू शकलो नाही. म्हणून आम्ही युती करू शकलो नाही. युती करण्याची जबाबदारी खासदार राणे यांच्यावर टाकण्याऐवजी ते जर भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगली वागणूक दिली असती तर युती करता आली असती. भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही युती केली असती तर आज जे निकालाचे चित्र दिसले आहे त्यापेक्षा अधिक वाईट चित्र दिसले असते.

खासदार नारायण राणे यांचा युतीबाबतचा शब्द पाळला नाही असे सांगितले जाते. परंतु खासदार राणे यांनी कणकवलीमध्ये उबाठासोबत जायचे नाही असेही सांगितले होते. ते विसरलं जातेय. त्याबद्दल काही भुमिका मांडली जात नाही. कणकवलीमध्ये मग आमदार निलेश राणे प्रचाराला का येत होते? समीर नलावडे हे खासदार राणे यांचे खंदे समर्थक असताना त्यांना पराभूत करण्यासाठी कुणाच्या खांद्याला खांदा लावून बसले होते? कसे षडयंत्र रचले जात होते? राणे कुटुंबावर कुठलेही संकट आले तर पहिले समीर नलावडे, बंडू हर्णे, राणे समर्थक हे धावून येणार. शहर विकास आघाडीतील कुणीही धावून येणार नाही. असे असताना खा.राणे यांचा शब्द का पाळला गेला नाही असा सवालही मंत्री नितेश राणे यांनी केला.

कणकवली ही खासदार राणे यांची जन्मभूमी आहे. मात्र या निवडणुकीत या शहरातच आम्ही दोघे वेगवेगळी भुमिका घेत होतो. कणकवलीमध्ये आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे स्वतंत्र पॅनेल का तयार केले नाही? 17 उमेदवार उभे करायला हवे होते आणि धनुष्यबाणाचा प्रचार करायला हवा होता. मी मालवणमध्ये जावून कमळाचा प्रचार केला, मशालच्या नावाने प्रचार केला नाही. कणकवलीमध्ये खा. राणे यांच्या बाबतीत जे संभ्रमाचे वातावरण तयार झाले त्याचा फटका बसला.

काही सांगायची वेळ 16 जानेवारीनंतर येणार आणि ते विस्तृतपणे सांगणार. आमदार निलेश राणे यांचा बोलविता धनी कोण होता याची माहिती, जो पैशा वाटपाचा आरोप भाजपवर झाला त्यासंबंधीची भुमिका आणि माझ्याकडे असलेली माहिती ती देणे क्रमप्राप्त आहे. कारण भाजप आणि कार्यकर्त्यांवर संशय घेतला गेला. तरीही आम्ही संयमाची भुमिका ठेवली. एका बाजुने बेजबाबदारपणाची भुमिका घेतली गेली तरी आमच्यामुळे कुणाची डोकी फुटू नये, कुणाला त्रास होवू नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये, पालकमंत्री म्हणून ती माझी जबाबदारी होती. त्यामुळे त्यावेळी संयमाची भुमिका आम्ही घेतली. परंतु महापालिका निवडणुकांचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे,त्यानंतर सगळी माहिती देण्यासाठी मी सज्ज आहे. भारतीय जनता पक्षाला लागलेले डाग पुसून काढण्याचे काम एक कार्यकर्ता म्हणून मी करणार आहे. भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, गृहमंत्री अमित शहा आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. खा.नारायण राणे हेदेखील भाजपचे नेते आहेत. असे असताना भाजपवर आरोप करणे योग्य नाही. राणे कुटुंबाला जे आज दिवस दाखवलेले आहेत ते भाजपमुळेच आहेत हे आमदार निलेश राणे यांना माहिती आहे. तरीही या पक्षाची बदनामी आपण का करतो आहोत? प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल ते तक्रार करत असतील तर आमचीही काही व्यक्तींबद्दल तक्रार आहेच ते आम्ही 16 तारखेला बोलू. ते म्हणत असतील आपल्या जीभेला हाड नाही तर मीही राणेच आहे असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT