सावंतवाडी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विरोधकांवर निशाणा साधला, ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच म्हटले की मी अर्थमंत्री असलो तरी निधीचे निर्णय मुख्यमंत्री घेतात. त्यामुळे जर ‘सबकुछ देवा भाऊच असतील, तर मग इतरांना मतदान करण्याचा प्रश्नच येत नाही’. प्रत्येक फाईल शेवटी मुख्यमंत्र्यांच्या सहीनेच मंजूर होते, हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही माहीत आहे.
जनता सूज्ञ आहे, त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर भाजपचाच विजय होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. ना. नितेश राणे म्हणाले, ज्या राजघराण्याने शहराला ओळख दिली, अनेक प्रकल्प राबवले, त्यांचे ऋण फेडण्याची ही संधी आहे. कारण श्रद्धाराजे भोंसले यांना मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मतदान आहे.
पालकमंत्री म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे. श्रद्धाराजे यांच्यासह आमच्या भाजपच्या संपूर्ण पॅनलला मतदारांनी निवडून दिल्यास शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठीकोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला. राजघराण्याने सावंतवाडीला सुंदरवाडी बनवले. रस्ते, पाणी, मोती तलाव, आरोग्य व्यवस्था, शैक्षणिक सुविधा कोणतीही अपेक्षा न ठेवता दिल्या.
आता त्यांच्याच कुटुंबातील सदस्याने निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे, ही वेळ परतफेड करण्याची आहे असेही ना. राणे म्हणाले. चुकीच्या पद्धतीने केसमध्ये गुंतवले जात असल्याच्या आरोपावर पालकमंत्री राणे म्हणाले, देशात, राज्यात डॉ. बाबासाहेबांचे संविधान चालते. केवळ आरोप करून चालत नाही, पुरावे द्यावे लागतात. मी पालकमंत्री आहे, त्यामुळे तसे चुकीचे करण्याची कुणाची हिंमत नाही. चाबुक खिशातच असतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
तलावाच्या जमिनीचा न्यायप्रविष्ट विषय राजकारणासाठी वापरला जात असल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर टीका केली. शहरातील जास्तीत जास्त जागा राजघराण्याचीच आहे, त्यामुळे श्रद्धाराजेंच्या रुपात राजघराण्यातील व्यक्ती सत्तेत बसल्यास निश्चितच सगळे प्रश्न मिटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी स्पष्ट केले की, आज केंद्रात व राज्यात भाजपचीच सत्ता आहे. शहरांच्या विकासासाठी निधी आम्हीच उपलब्ध करून देणार आहोत. आम्हाला राजकारण करायचे नाही, चारही शहरांचा जास्तीत जास्त विकास करण्याचा आमचा हेतू आहे. ही वैयक्तिक उणी-धुणी, हेवेदावे काढण्याची निवडणूक नाही असे ते म्हणाले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोंसले, लखमराजे भोंसले, सुधीर आडीवरेकर, बबन साळगावकर, अॅड. परिमल नाईक, उदय नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, राजू बेग, अॅड. अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.
राजघराण्याला सत्तेची जोड देणे आवश्यक
राणे यांनी यावेळी स्थानिक आ. दीपक केसरकर यांच्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, खरं तर स्थानिक आ. दीपक केसरकर यांनी त्या चष्म्यातून ही निवडणूक पाहायला हवी होती. राजघराणे विकासाची जबाबदारी घेत असेल, तर त्याला सत्तेची जोड देणे आवश्यक आहे. मात्र, ते जरी जाहीरपणे काहीही सांगत असले तरीही आ. दीपक केसरकर यांचा आशीर्वाद युवराज्ञींना आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.