पत्रकार परिषदेत बोलताना ना. नितेश राणे, समीर नलावडे, मिलिंद मेस्त्री. Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Nitesh Rane Allegation | संदेश पारकरांकडून नगराध्यक्षपद व 30 कोटींची होती मागणी

पालकमंत्री नितेश राणे यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

कणकवली: जे संदेश पारकर भ्रष्टाचार आणि भयाचे आरोप करत आहेत, त्याच संदेश पारकर यांनी आपली व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेवून भाजप प्रवेशाची इच्छा व्यक्त करत भाजप प्रवेशासाठी 30 कोटी रुपये आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, ती मागणी आम्ही फेटाळली असा गंभीर आरोप पालकमंत्री नितेश राणे यांनी केला. संदेश पारकरांची ती मागणी फेटाळल्यानेच त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी शहर विकास आघाडी स्थापन केली.

कणकवलीकर जनतेची ते फसवणूक करत आहेत, अशी टीकाही मंत्री राणे यांनी केली. येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत नितेश राणे बोलत होते. यावेळी भाजपचे कणकवलीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, निवडणूकीपूर्वी दोन-तीन महिने संदेश पारकर यांचा मला भाजप पक्षामध्ये घ्या, उबाठा शिवसेनेचे काही खरे दिसत नाही. मी तुम्हाला लवकरच भेटतो, असे संदेश पारकर हे मला व चव्हाण यांना म्हणाले. पुढे ते आम्हाला भेटायलाही आले व प्रवेशाची चर्चा सुरू झाली. पारकर यांनी माझ्याकडे 30 कोटी रुपये व कणकवलीचे नगराध्यक्षपद मागितले.

मात्र कणकवलीच्या नगराध्यक्षपदी भाजपतर्फे समीर नलावडेच लढणार, असे मी त्यांना स्पष्ट सांगितले. त्यावेळी मी पारकर यांना तुम्ही विधानसभा निवडणूक हरलात, त्यामुळे तुम्ही नगरपंचायत निवडणूक लढविण्यापेक्षा मी तुमच्या मुलाला संधी देतो असेही मी त्यांना सुचविले. मग त्यांनी पैशांचा आकडा खाली आणला. ही मागणी करत असताना मी, रवींद्र चव्हाण आणि समीर नलावडे हे पारकर यांना भ्रष्टाचारी वाटले नव्हतो का? असा सवालही मंत्री राणे यांनी केला.

ते म्हणाले, वास्तविक मला या विषयांवर बोलायचे नव्हते पण पारकर हे कणकवलीकर जनतेची फसवणूक करत आहेत. त्यांना केवळ स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा असतो. यापूर्वी देखील विधानसभा निवडणूक लढवताना ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे पारकर बोलले होते. पारकरांची शेवटची निवडणूक नेमकी कधी होणार, असा सवालही राणे यांनी केला. समीर नलावडे व आमच्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे नारायण राणेंवर निष्ठा दाखवली आहे.

गेल्या 14 वर्षात इतकी वादळे आली, पण नलावडे व कार्यकर्ते आमच्या सोबत ठाम राहिले. त्यामुळे अशांना डावलून मी अन्य कोणालाही संधी देणार नाही असेही राणे म्हणाले. संदेश पारकर हे केवळ स्वतःसाठी मत मागत असून नगरसेवक पदाचे उमेदवारांना मत मागत नाहीत. ही आघाडी पारकर यांच्या जीवावर आहे ना? मग फक्त एकट्यालाच मतदान का मागतात?

हि शहर विकास आघाडीच्या नेत्यांची आणि उमेदवारांची फसवणूक असल्याचे राणे म्हणाले. संदेश पारकर यांनी आपल्याकडे 30 कोटी मागितले हे खोटे असेल तर त्यांनी भालचंद्र महाराज आश्रमात येवून सांगावे असे आव्हानही मंत्री राणे यांनी दिले.

... यावरून राणेंची ताकद दिसते

शिंदे शिवसेना हा स्वतंत्र पक्ष असल्याने त्यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. नीलेश राणे हे शिंदे शिवसेना पक्षाचे नेते आहेत. त्यांनी कणकवलीत सर्व 17 जागांवर धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार उभे केले असते तर आम्हाला काही वाईट वाटले नसते. साहजिकच आम्हा सर्व मंडळींचे नीलेश राणेंसोबत भावनिक नाते आहे.

मात्र त्यांचा काहींकडून वापर केला जातो, असेही राणे म्हणाले. नारायण राणे यांच्या मुलाचा फोटो लावून मतदान मागण्याची वेळ संदेश पारकर व त्यांच्या शहर विकास आघाडीवर आली आहे. यावरुन राणेंची ताकद दिसते, असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT