AI for efficient public service delivery
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा हा 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (एआय) युक्त जिल्हा म्हणून देशात ओळखला जाणार असून सिंधुदुर्गला देशातल्या पहिल्या 'एआय' प्रणालीयुक्त जिल्हयाचा बहुमान मिळणार आहे.
या प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून सर्वांच्या साथीने यात आपण निश्चितच यशस्वी होऊ असे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सांगितले. ते महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थापना दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या एआय प्रणालीचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
तत्पूर्वी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे याच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . यावेळी यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर,प्रभारी पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे,मार्वलचे साई कृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. राणे म्हणाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा जाहिर केल्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा महत्त्वाच्या टप्प्यांवर पोहोचला आहे. जिल्हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून एआय प्रणालीची महत्वाची भूमिका असणार आहे. एआय चा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे.
आगामी काळात एआय प्रणालीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा जगासमोर आणि राज्यासमोर रोल मॉडेल म्हणून उभा राहील, याचा मला अभिमान आहे.तसेच एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज २०२५) उद्घाटन कार्यक्रमासाठी आज मुंबईत आले असताना सिंधुदुर्ग जिल्हा 'एआय'सारख्या तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करतोय ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
राज्यात महायुती सरकार आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र अधिक प्रगतीशील होत आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे व्हिजन आपल्या सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा ठाम विश्वास वाटतो असेही राणे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम दर्शनी पोलीस,आरोग्य,आरटीओ, कृषी या शासनाच्या खात्यात सुरू होणा-या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर होणार असून यामुळे प्रशासन अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि नागरिकांना जलद, प्रभावी सेवा देण्यासाठी व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना गतिमान सेवा व सर्वच विभागात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे यावर भर दिला जाणार असल्याने डिजिटल इंडिया आणि तंत्रज्ञान नवकल्पना या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा 'एआय' युक्त जिल्हा करण्याची संकल्पना उपस्थितासमोर सिंधुदुर्ग एआयचे पदाधिकारी तथा प्रभारी पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले विविध विभागाच्या अधिका-यांन समवेत सविस्तर संकल्पना मांडली.यावेळेस जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पत्रकार, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ,प्रशासनाचे विविध खात्याचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.