संदेश पारकर यांच्या विजयासाठी वाटेल ती किंमत मोजू  
सिंधुदुर्ग

Nilesh Rane : संदेश पारकर यांच्या विजयासाठी वाटेल ती किंमत मोजू

कणकवलीतील बैठकीत आ. नीलेश राणे यांचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : कणकवली शहराचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कायापालट करण्यासाठी आम्ही सर्वजण शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. नगरविकास खात्याच्या माध्यमातून या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. संदेश पारकर यांच्यासाठी आपण स्वतः मैदानात उतरलो आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी वाटेल ती किंमत मोजू, पण शंभर टक्के विजय मिळवू. शहर विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आता एकजुटीने प्रचारात सहभागी व्हावे असे आवाहन शिंदे शिवसेनेचे आ. नीलेश राणे यांनी केले.

कणकवली शहर विकास आघाडीची बैठक बुधवारी रात्री माजी आ. राजन तेली यांच्या निवासस्थाना समोर झाली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी आ. राजन तेली, शिवसेना उपनेते संजय आग्रे, ठाकरे शिवसेनेचे सतीश सावंत, काँग्रेसचे नागेश मोर्ये, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, अनंत पिळणकर आदी उपस्थित होते.

आ. नीलेश राणे म्हणाले, कणकवली शहर विकास आघाडीसाठी एवढी मोठी गर्दी जमवणे काही सोपी गोष्ट नाही. कुठलेही लेबल नसताना कार्यकर्त्यांच्या विश्वासावर, जनतेच्या प्रेमावर निवडणूकीला सामोरे जात आहात याबद्दल आपण संदेश पारकर यांचे कौतुक करतो. आपली पदे सोडून शहर विकास आघाडीत काम करण्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. 1990 पासून हे शहर आपण बघतो आहे. राजकारणातले नाक म्हणजे कणकवली आहे असा अनेक वर्षांपासून समज आहे. नगरविकास खात्यामार्फत या कणकवली शहरासाठी जी जी मदत लागेल ती संदेश पारकर हे निवडून आल्यानंतर ती देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. कुठेही कमी पडणार नाही, एकवेळ कुडाळ, मालवण मध्ये कमी पडेल पण कणकवलीमध्ये कमी पडू देणार नाही. माणूस जिद्दी असावा लागतो, माझाही दोन वेळा पराभव झाला, त्यावेळी राजकारणातून कदाचित फेकलोही गेलो असतो, पण जिद्द सोडली नाही.

जनतेचे ॠण फेडण्यासाठी पुन्हा जिद्दीने उभे राहीलो. पराभवाचा सामना करूनही संदेश पारकर पुन्हा त्याच जोमाने उभे राहीले आहेत, या त्यांच्या जिद्दीला आपण सलाम करतो. संदेश पारकर हे निर्भिड नेतृत्व आहे. संदेश पारकर यांच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत हे सांगण्यासाठी आज आपण आलो आहोत. चांगली व्यवस्था इकडे उभे करू, या शहराला चांगल्या सोयीसुविधा देऊ. कुडाळ, मालवणमध्ये काही चांगलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला. विकासाच्या मुद्यावरच ही निवडणूक होत आहे. संदेश पारकर विजयी होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यांच्या मागे लोकांचा पाठिंबा आणि सहानुभूतीही आहे. निश्चितपणे ही एक संधी शहरवासीय संदेश पारकर यांना देतील, असे असले तरी कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. या नगरपंचायतीवर शहर विकास आघाडीचा झेंडा लागण्यासाठी वाटेल ते करा, आपण तुमच्यासोबत आहे, कोणी आला तर फक्त फोन करा. चारही न.पं.वर झेंडे आपलेच लागतील. कितीही पैशाचा वापर होऊ दे पण जिद्द सोडू नका, आपलाच माणूस जिंकला पाहिजे यासाठी घराघरात जावून लोकांना समजावून सांगा. या जिल्ह्याने राणे कुटुंंबाला भरभरून दिले आहे ते आम्ही कधीही विसरणार नाही. आता उर्वरीत आयुष्य हे जिल्हावासीयांसाठीच आहे. आपल्या समोर कोण आहेत याची चिंता करू नका, आपलेच आहेत तर समोर का आहेत? आपल्यासोबत का नाहीत? हे महत्त्वाचे आहे. ते राजकारण वेगळे आहे. आपला शहर विकासाचा अजेंडा आहे. सर्वांनी एकजुटीने कामाला लागा असे आवाहन आ. राणे यांनी केले. यावेळी संदेश पारकर, सतीश सावंत, राजन तेली यांचीही भाषणे झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT