मालवण : मालवण येथील भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी आ. नीलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करीत टाकलेल्या धाडीत खोलीमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडल्यानंतर या प्रकरणाबाबत पोलिसांनी कोणती कारवाई केली. याबाबत माहिती घेण्यासाठी गुरुवारी दुपारी आ. राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील आणि पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेतली.
मालवण शहरांत अजूनही काही ठिकाणी असेच प्रकार होण्याची शक्यता असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशा सूचना आपण केल्याचे आ. नीलेश राणे यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत पाटील यांनी निवडणुकीतील अशा प्रकरणाबाबत तपास करण्यासाठी एक अहवाल समिती असून यां समितीला आम्ही प्राथमिक माहिती दिलेली आहे.
याबाबत समितीकडून निवडणूक विभाग व पोलिस यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत असून चौकशीनंतर समितीकडून अहवाल प्राप्त होऊन निवडणूक विभाग व पोलिसांना पुढील कार्यवाहीच्या सूचना करण्यात येणार आहे, त्यानुसार आम्ही पुढील कार्यवाही करू असे सांगितले. श्री. पाटील यांनी मालवणात आणखी दोन दक्षता पथके वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.
आ. नीलेश राणे यांनी मालवण पोलीस ठाण्याला भेट देत पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्याशी चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत आम. नीलेश राणे यांनी सदर प्रकरणात एफआयआर दाखल होण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, असे सांगितले.