सावंतवाडी : तळवडे-कुडाळ मार्गावर नेमळे तसेच परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा असलेला नेमळे-गावडेवाडी (ताडमाड) येथील मुख्य पूल धोकादायक बनला आहे. वर्षभरापूर्वी खासदार निधीतून सुमारे दीड कोटी रुपये खर्चून या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, सध्या पडत असलेल्या जोरदार पावसामुळे या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे पुलावरून वाहने चालवणे धोकादायक बनले असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या पुलावर कधीही जीवघेणे अपघात होण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत नेमळे ग्रामपंचायतीने संबंधित विभागाला पुलाच्या दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. नवीन पूल वर्षभरातच खराब झाल्याने बांधकामच्या दर्जाबाबत प्रश्न आहे. पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे लहान वाहनांना विशेष त्रास होत असून दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
अनेकवेळा रात्रीच्यावेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. वाहनचालक आणि ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडून तातडीने या पुलावरील खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.