कणकवली : ‘उदे गं अंबे उदे, उदे गं अंबे उदे’... असा जयघोष करत सोमवारपासून सिंधुदुर्गात भक्तिमय वातावरणात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. या शारदीय नवरात्रौत्सवाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना विधीने झाली. जिल्ह्यातील ग्राम मंदिरे, देवीची स्थाने, घरोघरी तसेच राजकीय पक्ष, सामाजिक मंडळांच्या वतीने अनेक ठिकाणी दुर्गामातांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त पुढील दहा दिवस सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रौत्सवानिमित्त सर्वत्र प्रसन्न आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.
वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि दैवी शक्तीचे प्रतीक म्हणून नवरात्रौत्सव सण साजरा केला जातो. सोमवारी सकाळी गावोगावच्या मंदिरांसह ठिकठिकाणी विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. वाजत-गाजत दुर्गा मातेच्या मूर्तींचे मिरवणुकीने आगमन झाले. दुर्गा मातेचीही विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सिंधुदुर्गात भाजप, ठाकरे शिवसेना आणि विविध सार्वजनिक मंडळांच्या वतीने दुर्गा मातांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्येही नवरात्रौत्सवाचा जागर सुरू झाला आहे.
कणकवलीत खा. नारायण राणे संपर्क कार्यालयाकडे बस स्थानकासमोर भाजपच्या वतीने दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली तर ठाकरे शिवसेनेच्या वतीने प्रांत कार्यालयानजीक दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. बाजारपेठ मित्रमंडळ कणकवली, सिंधुदुर्ग जिल्हा गोंधळी समाज आदींच्या वतीनेही दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दुर्गा मातेची विधिवत पूजा, आरती झाल्यानंतर दुपारपासून भजने, फुगड्या व विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. सोमवारी रात्रीपासून गरबा, दांडिया नृत्यावर तरुणाईची पावले थिरकण्यास सुरुवात झाली. पुढील नऊ दिवस डबलबारी, दशावतारी नाटक, फुगड्या, भजने आणि विविध स्पर्धांनी दुर्गामातेचा जागर केला जाणार आहे.