कुडाळ : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे राष्ट्रीय महाअधिवेशन गुरुवार 7 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायं. 4 वा. या वेळेत डॉ. शामा प्रसाद मुखर्जी, इनडोअर स्टेडियम, गोवा युनिव्हर्सिटी जवळ, सांताक्रूझ गोवा येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे 2 हजार ओबीसी समाज बांधव उपस्थित ठेवण्याचे नियोजन कुडाळ येथील बैठकीत करण्यात आले. तसेच अधिवेशनाच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार करण्यात आला.
या अधिवेशनाच्या नियोजनासाठी बैठक कुडाळ येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीला ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री, कार्याध्यक्ष सुनील भोगटे, सुवर्णकार समाज नेते काका कुडाळकर, भंडारी समाज नेते अतुल बंगे, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, गवळी समाजचे श्री.पंधारे, भंडारी समाज सदस्य बाळू साळगावकर आदी उपस्थित होते.
या बैठकीत गोवा येथे होणार्या अधिवेशनात सुमारे दोन हजार ओबीसी बांधव उपस्थित ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच अधिवेशनाच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार करण्यात आला. जिल्हास्तरावर ओबीसी समाज संघटना बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला मिळालेल्या 27 टक्के आरक्षणाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. शासकीय सेवेत पदोन्नतीच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.
प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह निर्माणासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. जातनिहाय जनगणना तातडीने करावी, यासाठी शासनाला निवेदन देण्याचे यावेळी ठरविण्यात आले. ओबीसी, विज व विशेष मागासवर्गीय समाजाच्या रिक्त पदांचा अनुशेष तात्काळ भरावा, अशी मागणी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.