वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील बारमाही नापणे धबधब्यावर उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या काचेच्या पुलावरून धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांची रीघ लागली आहे. शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी तर धबधब्यावर तुफान गर्दी करीत आहेत. रविवारी या पुलावर जाण्यासाठी पर्यटकांनी लाईन लावली होती.
नापणे धबधब्यावर उभारण्यात आलेल्या या काचेच्या पुलाचा लोकार्पण नुकतेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. त्या नंतर हा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. ‘सिंधुरत्न’ योजनेतून सुमारे 99 लाख 63 हजार रुपये खर्च करून हा पूल उभारण्यात आला आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा काचेचा पहिला पूल आहे. या काचेच्या पुलाची माहिती राज्यभर पसरली आहे. त्यामुळे हा पूल व पुलावरून धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून पर्यटक गर्दी करू लागले आहेत. सुट्टीच्या दिवशी तर धबधबा परिसर पर्यटकांनी फुलून जात आहे. पुलावर जाऊन पर्यटक, फोटो, सेल्फी, व्हिडिओ काढण्यात मग्न असल्याचे दिसून येत होते.
नापणे धबधबा हा बारमाही वाहणारा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. नाधवडे येथे उगम पावणार्या गोठणा नदीवर नाधवडे येथे हा धबधबा आहे. दोन्हीही बाजूने गर्द हिरवी गार झाडी, उंचावरून खोल डोहात कोसळणारे धबधब्याचे पांढरे शुभ्र फेसाळलेले पाणी असे विलोभनीय दृश्य पर्यटकांना भुरळ घालते. उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर पर्यटक मुख्य धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेल्या छोट्या धबधब्यात उतरून आनंद घेतात.
पावसाळ्यात नदीला येणारा पूर व पावसाळ्यात वाढलेला पाण्याच्या प्रवाहामुळे हा धबधबा उग्र रूप धारण करतो. त्यामुळे पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांना दुरूनच पहावा लागत होता. आता मुख्य धबधब्याच्या वरच्या बाजूला उभारण्यात आलेल्या या काचेच्या पुलामुळे थेट धबधब्यावर जाता येत आहे. पुलावर चढल्यानंतर पायाखालून वाहणारा नदीच्या पाण्याचा प्रवाह व त्याखाली असलेला धबधबा अगदी जवळून पाहता येत आहे. त्यामुळे धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी व राज्यात पहिला ठरलेला हा आकर्षक व अभिनव पद्धतीने उभारलेला काचेचा पूल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागले आहे. पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून याठिकाणी पोलिस व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. एकावेळी 25 पर्यटकांना पुलावर प्रवेश दिला जात आहे.
नापणे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. याठिकाणी पर्यटनाच्या द़ृष्टीने आवश्यक असलेल्या प्राथमिक सुविधा त्यामध्ये शौचालय, महिलांसाठी चेंजिंग रूम, यासारख्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.